सोशल मीडियावर अनेक वेळा कलाकारांना त्यांच्या कपड्यांवरुन आणि वाढलेल्या वजनावरुन ट्रोल करण्यात येते. खासकरुन छोट्या पडद्यावरील आणि बॉलिवूड अभिनेत्रींवर निशाणा साधला जातो. पण याच अभिनेत्री ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देतानाही दिसतात.

नुकताच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माही विज आणि तिचा पती जय भानुशाली यांनी बिग बॉस १३च्या विकेंडच्या एपिसोडमध्ये हजेरी लावली. दरम्यान माहीने ओव्हर साइज गाऊन परिधान केला होता. तिने या गाऊनवरचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. तिने परिधान केलेल्या ड्रेसवरुन तिला जाडी म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

माहीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताच एका ट्रोलरने तिच्या डिलीव्हरीनंतर वाढलेल्या वजनावरुन कमेंट केली आहे. त्याने ‘शरम कर मोटी’ असे म्हटले आहे. ट्रोलरची ही कमेंट वाचून माही देखील शांत बसली नाही. तिने सडेतोड उत्तर देत ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे. ‘तुझ्यासारख्या मूर्खाला जन्म दिल्यानंतर तुझी आई जाड झाली नव्हती का?’ असे माहीने पोस्टमध्ये लिहिले होते. ‘तरीही तुम्ही तुमच्या आईचा आदर करता ना… काहीही लिहिण्याआधी एकदा विचार करा’ असे माहीने पुढच्या पोस्टमध्ये लिहित चांगलेच सुनावले आहे.

आणखी वाचा : ‘अजित पवार म्हणजे धोबी के पप्पू,’ केआरकेने उडवली खिल्ली

लग्नाच्या तब्बल ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २१ ऑगस्ट रोजी माही आणि जयला मुलगी झाली. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव तारा असे ठेवले आहे. जयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे बाबा होण्याची माहिती दिली होती.