करोनाशी दोन हात करताना देशातील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत असून बेड,ऑक्सिजन सिलेंडर्स आणि औषधे यांसारख्या आवश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. इतक्या प्रचंड रुग्णसंख्येला ऑक्सिजन पुरवणे हे मोठं आव्हान निर्माण झालं असून, ऑक्सिजनअभावी रोज अनेक रुग्ण मरण पावत आहेत. यासाठी बॉलीवूड अभिनेता सोनू सूद पुढे आला, अनेक उद्योगपती, राजकारण्यांनी पुढे येऊन सरकारला जमेल तेवढी मदत केली. बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनीही करोनाबाधितांसाठी मदतीचा हात पुढे केलाय.

अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरामधल्या भाजपच्या खासदार देखील आहेत. मथुरामधल्या करोनाबाधितांसाठी हेमा मालिनी यांनी ७ ऑक्सिजन मशीन्स पुरवले आहेत. हेमा मालिनी यांनी स्वतः ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. सोबतच याचे फोटोज देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेत. या फोटोमध्ये त्यांनी पुरवलेले ऑक्सिजन मशीन्स लोक रूग्णालयात लावताना दिसून येत आहेत.

हे फोटोज शेअर करताना अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात त्यांनी लिहिलंय, “ब्रजवासियांची सेवा करण्यासाठी मथुरा जिल्ह्यात ७ ऑक्सिजन मशीन्स बसवताना पाहून धन्यता वाटत आहे. पुढील काही दिवसांत आणखी ऑक्सिजन मशीन्स आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोबत ६० ऑक्सिजन बेड्स देखील उपलब्ध होणार आहेत.”

‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनीचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलंय. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या फॅन्स आणि नेटकऱ्यांनी त्यांच्या या ट्विटला लाइक आणि कमेंट्स करत त्यांनी घेतलेल्या पुढाकारबाबत भरभरून कौतूक देखील केलं आहे. यासोबतच आणखी माहिती सांगताना विदेशातून डॉक्टरकीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सध्या करोना रूग्णांवर उपचारासाठी बोलवण्यात आलं असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.