सध्या चित्रपटसृष्टीवर अमली पदार्थ सेवनाविरोधात जे गंभीर आरोप केले जात आहेत, ते टाळेबंदीमुळे आलेल्या नैराश्यातून आलेले असल्याचे मत अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेने व्यक्त के ले. तिची प्रमुख भूमिका असलेली एमएक्स प्लेयरवरील ‘हाय’ ही वेबमालिका अशाच अमली पदार्थाच्या प्रकरणावर भाष्य करते. मृण्मयीने या वेबमालिके त असिमा चौहान या पत्रकाराची भूमिका साकारली आहे. असिमा ही आपल्या अभिनय कारकीर्दीतील आव्हानात्मक भूमिका असल्याचे ती मान्य करते.

या भूमिकेची पार्श्वभूमी सांगताना मृण्मयी त्याची कथाही थोडक्यात सांगते, ‘असिमा एका मनोरंजन वाहिनीत काम करते. एखाद्या घटनेला उगाच प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी त्याला मालमसाला लावून सांगणे हे तिचे मुख्य काम. पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या असिमाला वास्तव, लोकांच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टीत रस असतो. काही कारणाने तिला तिच्या आवडीचे काम करता येत नाही. अशाच बातम्यांच्या शोधात असताना तिला अचानक ‘मॅजिक’ या अमली पदार्थाचा सुगावा लागतो. या नशेच्या पदार्थाचे सामान्य माणसावर होणारे परिणाम, हे पुरवणारे दलाल यांची माहिती घेण्यात ती व्यग्र असते. बॉलीवूड, पेज थ्री पार्टी तसेच कलाकारांचे आयुष्य याचे सदैव वार्ताकन करणाऱ्या असिमातील खऱ्या पत्रकाराचा शोध सुरू होतो. तिला या प्रकरणामागील सत्य लोकांसमोर आणायचे असते. ही बातमी, या अमली पदार्थामागचे सत्य तिच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीला कलाटणी देणारे ठरते. यामुळे आपल्या हाती काहीतरी मोठे हाती लागेल याची तिला खात्री असते’.

‘हाय’ या वेबमालिके त मृण्मयीसोबत अभिनेते रणवीर शौरी आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मात्र, त्या दोघांचे कथानक वेगळे असल्याने मृण्मयीला त्यांच्यासोबत एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. मी साकारत असलेली असिमा  ही अक्षय ओबेरॉयच्या शोधात असते. छायाचित्रकार आणि दिग्दर्शक यांच्यासोबत काम करताना मात्र मला काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या, असे तिने सांगितले.

करोनामुळे नाटय़गृहेही बंद असली तरीही नाटकवेडय़ा मंडळींना अभिनयाचे वेड स्वस्थ बसू देत नाही. प्राप्त परिस्थितीवर मार्ग काढत सादरीकरणाचे काही ना काही मार्ग कलाकार मंडळी शोधून काढतातच. अभिनेता-दिग्दर्शक ऋषीकेश जोशींच्या संकल्पनेतून साकारलेले ‘नेटक ’ आणि पुण्यातील आसक्त कलामंचतर्फे साकारलेले ‘कलर ऑफ होप’ ही त्याचीच दोन उदाहरणे. या ऑनलाइन नाटकाच्या प्रयोगात मृण्मयीसोबत दीप्ती महादेव, इप्सिता आणि मानसी भालवलकर या अभिनेत्री आहेत. ‘नाटकाचे प्रयोग होत नसल्याने नाटकाच्या प्रवेशाला वाजणारी तिसरी घंटा, सादरीकरण केल्यावर प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद या गोष्टींची तीव्रतेने आठवण येत होती. पुण्यातील आम्ही नाटकवेडी मंडळी ऑनलाइन नाटक करता येईल का याचा विचार करत होतो. पुण्यातील आसक्त कलामंचच्या मोहित टाकळकरने नुकतेच ‘द व्हाइट बुक’ नावाचे पुस्तक वाचले. त्यातील एक विशिष्ट भाग निवडून त्याचे ऑनलाइन सादरीकरण करण्याचे त्याने ठरवले. यासाठी खोलीत बंदिस्त होऊन ऑनलाइन तालमी केल्याचेही मृण्मयीने सांगितले. आतापर्यंत त्यांचे पाच नाटकांचे प्रयोग झाले आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे, असे तिने सांगितले.  एक कलाकार म्हणून प्रेक्षकांना घरबसल्या नाटकाचा अनुभव देऊ शकलो यासारखे दुसरे समाधान नसल्याचे मृण्मयी सांगते. ऑनलाइन नाटकाचा प्रयोग पाहताना आम्ही प्रेक्षकांना मोबाइल सायलेंट करून ठेवणे, घरी मंद प्रकाश करणे अशा सूचना करतो. जेणेकरून त्यांना नाटय़गृहात जाऊन नाटक पाहिल्याचा भास होतो. येत्या काळात ‘कलर ऑफ होप’ हे नाटक, तसेच चार मोठे चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याचेही ती सांगते.

नाटकाचा संग्रह

करोनामुळे प्रत्येक कार्यक्रम आता ऑनलाइन पद्धतीने आयोजित केले जात आहेत. मग त्यात नाटकही मागे कसे राहील. नाटकाचे ऑनलाइन पद्धतीने सादरीकरण होत असल्याने ती कलाकृती जतन होत आहे. मराठीत अनेक दर्जेदार नाटके होऊन गेली आहेत, त्यांचे चित्रणच करण्यात आले नाही. अभिनयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही नाटके संदर्भ तसेच अभ्यासासाठी उपलब्धच नाहीत. जास्तीतजास्त नाटकांचे चित्रण करून ती जतन केली पाहिजेत. सध्या अनेक दर्जेदार नाटके पुन्हा यूटय़ूब, ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत आहेत. याचा फायदा पुढील पिढीला होईल. नाटकाची मजा ही प्रत्यक्ष नाटय़गृहातच जाऊन पाहण्यात आहे. राज्य सरकारने जशी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही परवानगी दिली. त्याप्रमाणे राज्यातील नाटय़गृहेही खुली करण्यास परवानगी दिली पाहिजे, असे मत मृण्मयीने व्यक्त केले.

ऑनलाइन गप्पांचा ‘अल्पविराम’

टाळेबंदीच्या पहिल्या तीन महिन्यांत मी पुण्यात आई-वडिलांकडे राहायला होते. तेव्हा वडील श्रीरंग गोडबोलेंना हा काळ असाच सुरू राहील याची कल्पना होती. तेव्हा ‘इंडियन मॅजिक आय’तर्फे आम्ही ‘अल्पविराम’ नावाचा कार्यक्रम सुरू केला. दररोज सायंकाळी कलाकार, गायक, छायाचित्रकार, दिग्दर्शक प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. त्यांच्याशी संवाद साधत होते. याचा शेवटचा भाग झाल्यावर मला रडायला आले. समोरचा पाहुणा कलाकार बदलला तरीही मी ४४ दिवस प्रेक्षकांशी बोलत आणि गप्पा मारत होते. प्रेक्षकांशी माझे भावनिक नाते तयार झाले होते, अशी आठवणही तिने सांगितली.