‘गोरे रंग पे न इतना गुमान कर’ हे गाणं म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे अभिनेत्री मुमताज यांचा. आज ३१ जुलै रोजी मुमताज यांचा वाढदिवस आहे. ६०- ७० च्या दशकात मुमताज यांनी अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली होती. एके काळी अनेकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीचा जन्म एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला होता.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे वयाच्या १२ व्या वर्षी मुमताज यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मल्लिका या लहान बहिणीसोबत मुमताज नेहमीच स्टुडिओत फेऱ्या मारुन लहान मोठ्या भूमिका मिळवण्यासाठी प्रयत्न करत असत. त्यांची आई नाज आणि काकी नीलोफर आधीपासूनच चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. पण, ज्युनिअर आर्टिस्ट असल्यामुळे त्यांनी कधीही आपल्या मुलीचं म्हणजेच मुमताज यांचं नाव पुढे केलं नाही. मुमताज यांना त्यांच्या कारकिर्दीत सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या. पण, त्यानंतरच्या काळात ज्यांनी त्यांचं नाव ऐकून नाकं मुरडली होती तेच चेहरे मुमताज यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी उत्सुक होते.

‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाने मुमताज यांच्या कारकिर्दीला कलाटणी दिली. चित्रपटसृष्टीत नावारुपास येत असतानाच या सौंदर्यवतीचं नाव काही सहकलाकरांशी जोडलं गेलं. संजय खान, फिरोज खान, देव आनंद आणि शम्मी कपूर या कलाकारांसोबत मुमताज यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. पण, त्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं ते म्हणजे शम्मी कपूरसोबतच्या बहुचर्चित रिलेशनशिपमुळे. १८ व्या वर्षीच मुमताज यांना शम्मी कपूर यांनी लग्नाची मागणी घातल्याचं म्हटलं जातं. त्यावेळी मुमताजसुद्धा शम्मीजींच्या प्रेमात होत्या. पण, लग्नानंतर चित्रपटसृष्टीतील करिअर सोडून कुटुंबाला प्राधान्य द्यावं अशी शम्मी कपूर यांची अपेक्षा होती. पण, या एका अटीमुळे त्यांच्या प्रेमाचा गाडा पुढे जाऊ शकला नाही. शम्मीजींच्या लग्नाच्या प्रस्तावाला मुमताज यांनी नकार दिला आणि त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागला.

१९७४ मध्ये त्यांनी मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीतूनही काढता पाय घेतला आणि त्या लंडनला स्थायिक झाल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत साठच्या दशकात आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देत मुमताज यांनी स्वत:चं स्थान अबाधित राखलं. काळानुरुप बदलणारे चित्रपट, कलाकार, चित्रपटसृष्टी आणि कौटुंबिक जबाबदारीचा अंदाज घेत मुमताज यांनी त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य दिलं. सध्याच्या घडीला मुमताज चित्रपटसृष्टीपासून फार दूर असल्या तरीही त्यांचं चाहत्यांच्या मनातील स्थान मात्र कायम आहे.