भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नर्गिस. त्यांचे चित्रपटसृष्टीमध्ये मोठे योगदान आहे. आज नर्गिस यांची जयंती आहे. त्यानिमित्त आपण त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. नर्गिस आणि सुनील दत्त यांची जोडी त्यावेळी हिट ठरली होती. पण ते दोघे लग्नबंधनात अडकणार हे कळताच सुनील दत्त यांना अंडरवर्ल्ड डॉनकडून धमकी मिळाली होती.

नर्गिस यांचा जन्म १ जून १९२९ साली कलकत्ता येथे झाला होता. त्यांचे मूळ नाव फातिमा रशिद होते. मात्र, चित्रपटसृष्टीत त्या नर्गिस या नावानेच ओळखल्या जात असत. १९३५ साली त्यांनी तलाश-ए-इश्क चित्रपटातून बालकलाकार म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम करत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. नर्गिस यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

आणखी वाचा : …म्हणून रिद्धिमा कपूर आहे चित्रपटसृष्टीपासून लांब

‘मदर इंडिया’ या चित्रपटात नर्गिस आणि सुनील दत्त यांनी एकत्र काम केले होते. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. या चित्रपटानंतर त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण सुनील दत्त यांच्यासाठी नर्गिसशी लग्न करणे सोपे नव्हते. त्यांच्या अफेअरच्या चर्चा ऐकून एक दिवस मुंबईमधील डॉन नाराज झाला होता. त्याने सुनील दत्त यांना धमकी देखील दिली होती. पण त्याच्या धमकीने सुनील दत्त घाबरले नाहीत. ‘संजू’ चित्रपटामधील एका सीनमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

सतत येणाऱ्या धमक्यांनी सुनील दत्त हे घाबरुन न जाता त्यांनी डॉनला भेटण्याचा निर्णय घेतला. डॉनला भेटल्यानंतर सुनील दत्त म्हणाले, ‘माझे नर्गिसवर प्रचंड प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे. मी तिला आयुष्यभर आनंदात ठेवेन. माझे बोलणे जर तुम्हाला चुकीचे वाटत असेल तर मला गोळी घाला आणि खरे वाटत असेल तर मला मिठी मारा.’ त्यांचे हे बोलणे ऐकून डॉन त्यांच्यावर खुश झाला. त्यानंतर १९५८ साली नर्गिस आणि सुनील दत्त यांचा विवाह झाला.

नर्गिस यांनी संपूर्ण करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. त्यामध्ये ‘श्री 420’, ‘बरसात’, ‘अंदाज’, ‘जान-पहचान’, ‘प्यार’, ‘आवारा अनहोनी’, ‘आशियाना’, ‘आह’, ‘धुन’, ‘पापी’, ‘जागते रहो’, ‘चोरी चोरी’, ‘मदर इंडिया’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.