नीना गुप्ता यांचे नाव घेतले की नजरेच्या नजाकतींनी भारलेला सहज अभिनय आणि त्यांचा बोलका चेहरा डोळ्यासमोर येतो. अनेक हिंदी चित्रपटांसोबत इंग्रजी आणि भाषांतील चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका वठवल्या आहेत. परंतू, मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आजवर कधीच काम केले नाही. पण, आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा पट्टशिष्य, हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक अग्रगण्य लेखक-दिग्दर्शक श्याम महेश्वरी हा ‘चरणदास चोर’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. येत्या मंगळवारी २८ नोव्हेबर रोजी अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या हस्ते चित्रपटाचा संगीत प्रकाशन आणि ट्रेलर लाँच सोहळा संपन्न होणार आहे.

वाचा : …या हॉलिवूडपटात पाहायला मिळणार लावणीचा ठसका

‘चरणदास चोर’चा पहिला टीजर पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटाबाबतची उत्सुकता ताणली गेली. यामागचे कारण म्हणजे पोस्टरवर झळकलेली रंगीबेरंगी पेटी. कधी रेल्वे रुळावर तर कधी तलावातील बोटीत….कधी शनिवार वाड्यावर तर कधी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर दिसणाऱ्या या पेटीत नक्की दडलंय काय? याचा उलगडा काही केल्या होत नव्हता. पण, येत्या मंगळवारी मुंबईतील कार्यक्रमात खुद्द नीना गुप्ता ‘चरणदास चोर’च्या पेटीचे रहस्य उलगडणार आहेत.

वाचा : ‘…तर अली असगरला माझ्या शोमधून काढलं असतं’

ऋषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यांसारख्या महान चित्रकर्मींच्या मार्मिक पण सहज विनोदाच्या शैलीने प्रभावित होऊन लेखक-दिग्दर्शक श्याम महेश्वरी आणि क्रीएटीव्ह दिग्दर्शक संजू होलमुखे यांनी त्याच पठडीतील पण आजच्या काळाला सुसंगत असणाऱ्या ‘चरणदास चोर’ या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. श्याम महेश्वरीने ‘सास भी कभी बहू थी’, ‘कसोटी जिंदगी की’, ‘पलछीन’, ‘मंथन’, ‘कहानी घर घर की’, सात फेरे’ आणि ‘बंधन’ पासून ते अलिकडच्या ‘जोधा अकबर’, ‘एक दुजे के वास्ते‘ पर्यंत अनेक टीव्ही मालिकांच्या हजारो भागांचे लेखन-दिग्दर्शन केले आहे.