केंद्र सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याच्या निर्णयाचं देशवासियांकडून कौतुक केलं जात आहे. अनेकांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. केंद्र सरकारने निर्णय जाहीर करताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. यामध्ये सर्वसामान्यांसह सेलिब्रेटींचाही समावेश होता. अभिनेत्री निया शर्मानेही ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना देश वाचवल्याबद्दल आभार मानले आहेत.

निया शर्माने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देश वाचवल्याबद्दल आभार. टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा परवानगी देऊ नका”.

आणखी वाचा- भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक… TikTok सह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी

लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

आणखी वाचा- ‘तो’ आरोप चुकीचा, भारत सरकारने बंदी घातल्यानंतर TikTok चा खुलासा

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.

आणखी वाचा- ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्याने भारतातील हजारो कर्मचारी होणार बेरोजगार, आकडा वाचून धक्का बसेल

भारत आणि चीन सैन्यात गलवान खोऱ्यात संघर्ष होण्याच्या आधीपासून म्हणजे देशात करोनाचा फैलाव वाढू लागल्यापासूनच चिनी वस्तूंप्रमाणे चिनी मोबाइल आणि अ‍ॅपवरही बहिष्कार घालण्यासंदर्भात समाजमाध्यमांवरून मोहीम चालवली जात होती. ही अ‍ॅप वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारीही सातत्याने येत होत्या. विशेषत: टिकटॉक या लोकप्रिय अ‍ॅपवरून प्रसारीत केल्या जाणाऱ्या चित्रफिती आणि संवाद यांच्याविषयी अनेकदा वादंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी या अ‍ॅपवर घातलेल्या बंदीचे स्वागत होत आहे.