आगामी पाच राज्यांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री रिमी सेनने मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या २००३ मध्ये आलेल्या ‘हंगामा’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. २०१५ मध्ये ‘बिग बॉस’मध्ये तिला शेवटचे पाहण्यात आले होते.

आतापर्यंत तिने अजय देवगण, सलमान खान आणि अक्षय कुमार यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या ‘बागबान’ या सिनेमातही तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली होती. रिमी सेनने ‘बुधिया सिंग- बॉर्न टू रन’ या सिनेमाची निर्मितीही केली होती. या सिनेमात मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या एका खेळाडूची कथा सांगण्यात आली होती. तसेच तिने काही दाक्षिणात्य सिनेमातही काम केले होते.

दरम्यान, उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच आता अभिनेत्यांचाही आधार घेण्याची रणनिती आखली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ हे दोघेही भाजपसाठी प्रचार करणार आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असून उत्तर प्रदेशमध्ये यश मिळवून राज्यसभेतील संख्याबळ वाढवण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. आता भाजप अभिनेत्यांचा आधार घेणार आहे असेच दिसते. अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ हे दोघेही भाजपसाठी प्रचार करणार आहेत. सुरुवातीला हे दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र अर्जुन रामपालने सक्रीय राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ‘मी काही राजकारणी नाही, मी राजकारणासाठी इथे आलो नाही. मी फक्त भाजपला कसा पाठिंबा देता येईल यासाठी इथे आलो’ असे त्याने सांगितले होते. उत्तर प्रदेशमध्ये पत्रकारांशी बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली होती.