सखी गोखले, अभिनेत्री

शब्दांकन – सौरव आंबवणे

‘दिल दोस्ती दुनियादारी’ची शूटिंग सुरू होती. सुरुवातीचे दिवस होते. सहकलाकार अमेय वाघबरोबर मोठा वन टेक होता. हा टेक मला जमतच नव्हता. जवळपास आठ टेक झाले. मी गोंधळले होते. आपल्यामुळे विश्रांतीचा वेळ मिळत नाही. केवळ आपल्यामुळे लोक ताटकळत राहत आहेत. मला याचा प्रचंड ताण आला. मी तिथून निघून लांब जाऊन रडायला लागले. त्या वेळी मालिका दिग्दर्शकाने आत्मविश्वास दिला. वेळ घेऊन काम करण्यास सांगितले. स्वत:चा वेळ घेऊन मी तो टेक पूर्ण केला आणि माझा अभिनयावर पूर्णपणे विश्वास बसला. तेव्हापासून ताण घेण्यापेक्षा वेळ घेतलेला कधीही उत्तम ही बाब लक्षात आली.

ताणमुक्तीची कारणे वेगवेगळी असतात. आपण या जगातले एक टिंब आहोत. चंद्रावरून जरी आपण पाहायचे झाले तर आपण टिंबाएवढीसुद्धा दिसणार नाही. मग ताण किती लहान असेल. एवढे लहान स्वरूप असेल तर त्या ताणाची न घेतलेलीच बरी. जेव्हा ‘दिल दोस्ती दुनियादारी’ लोकप्रिय होत होती तेव्हा माझी आई मला सांगायची, लोकप्रियतेने स्वत:वर हुरळून जाऊ शकतो. त्यामुळे कामावरून घरी आलात, कोणत्याही प्रकारचे काम असू दे, पण घरी एकदा आल्यावर परत शून्यावर यायचे. तुम्ही स्वत: कोणीच नाही या भावनेतून शून्य बनणे हेसुद्धा ताण शून्यच करते. प्रत्येक दिवस हा मी काही नाही असाच सुरू व्हायला हवा म्हणजे कोणतीही गोष्ट स्वीकारायला सोपे जाते. मी कामावरून आल्यावर वेगवेगळ्या संकेतस्थळांवर माहिती वाचणे हे काम मी आवडीने करते. योगा, मेडिटेशन, संगीत या गोष्टींचा मी अभ्यास केला आहे. ते मी आवडीने करते. तणावाकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. सध्याचा काळ हा सर्वोत्तम काळ आहे. आपण सगळेच खूप ग्लोबल झालो आहोत. इंटरनेटमुळे किंवा आजूबाजूच्या घडामोडींमुळे आपल्या सीमा खूप विस्तारल्या आहेत. मध्यंतरी ‘मीटू’ असेल किंवा ‘टाइम्स अप’सारख्या चळवळींनी स्वत:त बदल घडवून आणला आहे.