अभिनेता सैफ अली खान याची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान लवकरच केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटासाठी तिने आपले वजन मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना साराचे वजन ९६ किलो होते हे ऐकून तुम्हालाही धक्का बसल्यावाचून राहणार नाही. आता चित्रपटात जायचे म्हटल्यावर वजन तर कमी करायलाच हवे. पण तिचे वजन काही केल्या कमी होत नव्हते. याचे कारण म्हणजे तिला PCOD हा आजार होता. नुकतेच एका कार्यक्रमात तिने आपल्या या आजाराबाबत जाहीररित्या सांगितले. या आजारामुळेच आपल्याला वजन कमी करणे शक्य होत नसल्याचेही तिने या मुलाखतीत सांगितले.

याबाबत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात दर १० मुलींमागे एक मुलगी या आजाराची शिकार होते. PCOD म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हरी डिसिज असे म्हणतात हा आजार PCOS म्हणजेच पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम म्हणूनही ओळखला जातो. याची लक्षणे म्हणजे वजन एकाएकी वाढणे, शरीरावर अनावश्यक केस उगवणे, थकवा येणे, डोकेदुखी, झोपेच्या समस्या, वंध्यत्व यांसारख्या समस्या उद्भवतात. मागील ५ ते ८ वर्षात या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून चुकीची जीवनशैली हे याचे मुख्य कारण आहे. लठ्ठपणा ही यातील सर्वात मोठी समस्या असल्याचेही समोर आले आहे. व्यायामाची कमतरता आणि डाएटशी निगडीत गोष्टी हा आजार होण्यास कारणीभूत आहेत.