News Flash

ताणमुक्तीची तान : आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी पाहा

मला लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टीचे नियोजन कसे करावे याबद्दल नेहमीच ताण येत असे.

श्रेया बुगडे, अभिनेत्री

श्रेया बुगडे, अभिनेत्री

चित्रीकरण, दौरे यामुळे व्यग्र वेळापत्रक असते. त्यामुळे ताण येणे स्वाभाविक आहे. पण ताण आल्यानंतर विचारांमध्ये सकारात्मकता आणणे अतिशय महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचार केल्यानंतर ताण आपोआपच कमी होतो. आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात.

या गोष्टी पाहात आणि ऐकत मोठे व्हायचे असते. माझ्यासाठी काम हेच माझ्या ताणमुक्तीचे महत्त्वाचे साधन आहे. दोन दिवसांहून अधिक मी घरी असले की मला आजारपण येते. त्यामुळे सतत कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करते.

आजकल चांगले चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर संकल्पना या सिनेमांमध्ये असतात. गेम ऑफ थ्रोन्ससारखी कलाकृती बाघायला मिळणे हे मी माझे भाग्य समजते. अशा अनेक कलाकृती सादर होत आहेत. निरनिराळे प्रयोग होत आहेत. या माध्यमातून मी मनावर आलेला ताण हलका करत असते. याव्यतिरिक्त खरेदी करणे मला प्रचंड आवडते. ताण आल्यानंतर मी खरेदीला जाते.

मित्र- मैत्रिणींना भेटणे त्यांच्याशी गप्पा मारणे. नवनवीन कल्पना जाणून घेणेदेखील मला आनंददायी वाटते. सतत कृतिशील राहावे म्हणजे ताण नाहीसा होतो. आपण जो विचार करतो तसेच घडत असते. त्यामुळे विचार करतानाच तो प्रगल्भ असावा. आजकाल संवादही कमी झाला आहे. पण ताण आल्यानंतर मुख्य गोष्ट ही संवाद आहे. मला लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टीचे नियोजन कसे करावे याबद्दल नेहमीच ताण येत असे.

अशा वेळी मी आई, सासू यांच्याशी याबद्दल संवाद साधला. त्या वेळी अगं असंच असतं आम्हीपण हेच केलं हे आईचे शब्द खूप धीर देतात. तर सासू-सासऱ्यांचे तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना असे शब्द आधार देतात. त्यामुळे माझा ताण आपसूकच हलका होतो. याशिवाय वाचण्यापेक्षा एखाद्या विचारवंत आणि सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची भाषणे मी ऐकते. त्यातूनदेखील मनाला उभारी मिळते.

चला हवा येऊ  द्याच्या निमित्ताने अनेक सामाजिक संस्थांना भेटण्याचा योग आला त्यांनी केलेले कार्य बघून काम करण्याची ऊर्जा अधिक बळावते असे मला वाटते. आजकालच्या तरुण पिढीकडे अनेक गुण आहेत. त्यांचे एखाद्या विषयावर आपले मत मांडणे असो किंवा वेगवेगळे कार्य करणे असो त्यांच्यामध्ये मला ऊर्जा जाणवते. या ऊर्जेचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. त्यामुळे मनावर ताण येणे आपसूकच कमी होईल.

शब्दांकन – भाग्यश्री प्रधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 3:04 am

Web Title: actress shreya bugde tips to help manage stress
Next Stories
1 न्यारी न्याहारी : चीज-पालक-बटाटा सँडविच
2 बचतीची दिवाळी
3 मस्त मॉकटेल : पॅशन फ्रूट कूलर
Just Now!
X