वृत्तपत्र केवळ वाचण्यासाठी उपलब्ध न करता दर्जेदार उपक्रमांचे आयोजन केल्याने वाचकांशी संपर्क वाढतो. वाचकांच्या दृष्टीने ‘लोकसत्ता खाद्य महोत्सवा’सारखे उपक्रम होणे गरजेचे आहे, असे मत अभिनेत्री श्रुती मराठे यांनी रिसो राईसब्रॅन ऑइल प्रस्तुत एक्सप्रेस खाद्य महोत्सवात व्यक्त केले. खाद्य महोत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी ठाण्यातील विविध दुकाने आणि उपाहारगृहांना अभिनेत्री श्रुती मराठे यांनी भेट दिली. ग्रील हाऊस, मालवण तडका, प्रशांत कॉर्नर आणि फिश लँड येथे खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथील विविध पदार्थांची चव घेत श्रुती मराठे यांनी उपाहारगृहांच्या मालकांशी संवाद साधला.
घरी पूर्णत: शाकाहारी जेवण असते. मात्र शाकाहारी जेवणापेक्षा मांसाहारी जेवण जास्त आवडते. त्यातही मासे खाण्याकडे कल असतो, असे खाण्याच्या आवडीविषयी बोलताना श्रुती मराठे यांनी सांगितले.
लोकांचा चांगला प्रतिसाद
एक्सप्रेस खाद्य महोत्सवाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. लोकसत्ताचा उपक्रम असल्याने लोक विश्वासाने सहभागी होतात. नेटके आयोजन केले होते, असे ग्रील हाऊसचे मालक ओंकार बापट यांनी मत व्यक्त केले.

खाद्य महोत्सव कौतुकास्पद
एक्सप्रेस आयोजित खाद्यमहोत्सव उपक्रम कौतुकास्पद आहे. इतर महोत्सवांपेक्षा हा खाद्य महोत्सव ग्राहकांना आकर्षित करणारा ठरला. नवीन पदार्थ ग्राहकांना उपलब्ध करुन देता आले असे मालवण तडका रेस्टोरंटचे दिवाकर शेट्टी यांनी उपक्रमाविषयी बोलताना सांगितले.

रेस्टॉरंटमध्ये ग्राहक लोकसत्ताचे कूपन्स आवडीने भरत होते. लोकसत्ताच्या या उपक्रमाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षांतून एकदा असे उपक्रम जरुर व्हायला हवेत.
– सुरेश गिरीयान, फिश लॅंड रेस्टॉरंट

खाद्य महोत्सवाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. लोकसत्ताच्या अनेक उपक्रमांमध्ये आमचा सहभाग असतो. अशा उपक्रमांमुळे ग्राहकांशी संवाद साधला जातो. त्यामुळे ग्राहक आणि दुकानदार यांच्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम होणे गरजेचे आहेत. भावी उपक्रमांसाठी शुभेच्छा आहेत.
– प्रसाद बापट, प्रशांत कॉर्नर