अभिनेत्री सोहा अली खानने ‘दिल मांगे मोर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटानंतर केवळ मोजक्याच चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर सोहाने रुपेरी पडद्यापासून फारकत घेतली. कलाविश्वामध्ये फारसा वावर नसतानाही सोहाकडे अद्यापही चित्रपटांच्या ऑफर्स येत आहे. विशेष म्हणजे तिला मराठी चित्रपटांच्यादेखील ऑफर्स येत असून तिला या चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. मात्र भाषेच्या अडचणीमुळे तिला या ऑफर्स नाकाराव्या लागत असल्याच खंत तिने व्यक्त केली आहे.

सोहाने काही बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं असून आता तिच्याकडे मराठी चित्रपटांच्याही ऑफर्स येत आहेत. मात्र मराठी भाषा नीट बोलता येत नसल्यामुळे तिने हे चित्रपट नाकारल्याचं सांगण्यात येत आहे.

“प्रादेशिक चित्रपटांमध्ये वास्तवाचा गंध असतो. या चित्रपटातून संस्कृतीचं दर्शन होत असतो. भाषेच्या माध्यमातून चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचविता येतं. त्यामुळे प्रादेशिक चित्रपटांमध्ये भाषा हे प्रभावी माध्यम आहे. मात्र जर ही भाषा येत नसेल तर आपला अभिनय प्रेक्षकांच्या काळजाला भिडणार नाही. त्यामुळे जर एखाद्या प्रादेशिक चित्रपटात झळकायचं असेल तर तेथील भाषा येणं गरजेचं आहे”, असं सोहा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “माझ्याकडे अनेक मराठी चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आहेत. मात्र मला मराठी नीट बोलता येत नसल्यामुळे मी या चित्रपटांना नकार कळविला आहे. परंतु मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची माझी प्रचंड इच्छा आहे”.

दरम्यान, सोहाने ‘दिल मांगे मोर’ या चित्रपटातून २००४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर ती ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. मात्र या चित्रपटानंतर सोहाने बॉलिवूडपासून फारकत घेतली.