12 December 2019

News Flash

‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’मध्ये सुलोचना दीदींच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी

या चित्रपटातील तिच्या फर्स्ट लूकवरुन नुकताच पडदा उचलण्यात आला.

सुलोचना दीदी, सोनाली कुलकर्णी

मराठी कलाविश्वात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास लवकरच ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून उलगडणार आहे. अभिनय क्षेत्रात आपला असा वेगळा ठसा उमटवणाऱ्या या मातब्बर कलाकाराचा प्रवास उलगडण्यासोबतच या चित्रपटातून त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवरही भाष्य करण्यात येणार आहे.

मराठी कलाविश्वात एक काळ गाजवणाऱ्या या कलाकाराच्या प्रवासात त्या काळच्या इतरही लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका होत्या. त्याच भूमिका उलगडण्यासाठी अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचीही वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटात सुमीत राघवन याची काय भूमिका असणार यावरुन पडदा उचलण्यात आला होता. त्यामागोमागच आता सोनाली कुलकर्णी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’मध्ये कोणाची व्यक्तीरेखा साकारणार आहे, हे जाहीर करण्यात आलं आहे. सुबोध भावे आणि खुद्द सोनालीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याविषयीची सोशल मीडिया पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं.

रुपेरी पडद्यावर आईच्या भूमिकेला न्याय देणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ् अभिनेत्री सुलोचना दीदी यांची व्यक्तीरेखा सोनाली साकारत आहे. या चित्रपटातील तिच्या फर्स्ट लूकवरुन नुकताच पडदा उचलण्यात आला. ज्यामध्ये सुलोचना दीदींप्रमाणेच चेहऱ्यावर अगदी सुरेख भाव असणारी सोनाली प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘ज्यांच्याकडे बघून नेहमीच चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते, ज्यांचा आशीर्वाद मिळाला की आईचा हात पाठीवर आहे असं वाटतं, त्या आमच्या सर्वांच्या आदराचं स्थान…सुलोचना दीदी’, असं कॅप्शन लिहित सुबोधने ही पोस्ट केली. सोनालीचा हा लूक सध्या कलाविश्वात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

७ नोव्हेंबरला हा महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या ‘आणि काशिनाथ घाणेकर’मध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा अभिनेता म्हणून झालेला उदय आणि अस्त दाखवण्यात येणार आहे. त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमयरित्या बदलून टाकला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिजीत देशपांडे यांनी घेतली आहे.

First Published on September 11, 2018 12:05 pm

Web Title: actress sonali kulkarni to play sulochana didis role in subodh bhave starrer movie ani dr kashinath ghanekar
Just Now!
X