बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सतत सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडत असते. पण सध्या ट्विटरवर स्वरा आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांच्यामध्ये वाद सुरु असल्याचे दिसत आहे.

नुकताच स्वराने ट्विटरवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने, ‘काका, मी तुमच्या मुलीसोबत काम केले आहे म्हणून मी तुम्हाला काका म्हणत होते. मी तिला खूप आधीपासून ओळखते, आमच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते आहे. तुमच्या मुलीमुळे मी तुमचा आदर करत होते. पण मला असं वाटतय तुम्हाला या आदराची सवय नाही. तुम्ही मला सतत टॅग करत आहात आणि हे सत्य आहे’ असे म्हणत ती अशोक पंडित यांच्यावर भडकली असल्याचे दिसत आहे.

स्वराने केलेल्या ट्विटनंतर अशोक पंडित देखील शांत बसले नाहीत. त्यावर त्यांनी लगेच उत्तर दिले आहे. ‘काकू, जेव्हा एखादी व्यक्ती योग्य वेळेत लग्न करते तेव्हा तिची मुले योग्य वेळेतच मोठी होतात. हा प्रत्येकाच्या नशीबाचा भाग आहे. आता जर कोणाचे लग्न होत नसेल किंवा ती करत नसेल तर याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती वयाने लहान आहे. चांगले तर माझे कुटुंब आहे’ असे अशोक पंडित यांनी ट्विट करत स्वराला सुनावले आहे.

सध्या अशोक पंडित आणि स्वरा भास्करमध्ये जोरदार ट्विटर वॉर सुरु आहे. हे वॉर स्वराने काही दिवासांपूर्वी स्थलांतरीत कामगारांना मदत करण्यासाठी केलेल्या ट्विटमुळे सुरु झाले. ‘जर तुम्ही दिल्ली किंवा दिल्लीच्या आसपास राहणारे कामगार असाल तसेच तुम्हाला माहित असलेल्या कोणत्या कामगाराला उत्तर प्रदेश- बिहार येथील कोणत्या गावी जायचे असेल तर तुमचे नाव, मोबाईल नंबर, तुम्ही सध्या कुठे आहात, तुम्हाला कुठे जायचे आहे याची संपूर्ण माहिती दिलेल्या फॉर्ममध्ये भरा’ असे तिने ट्विट केले होते.

त्यावर अशोक पंडित यांनी ‘तुम्ही तर स्वत: कागद दाखवण्यास नकार दिला होता आणि आता तुम्हीच दुसऱ्यांकडे मागता? लोकं किती लवकर बदलतात?’ असे ट्विट करत म्हटले होते. त्यावर स्वरानेही उत्तर दिले होते.