बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या बायोपिकच्या ट्रेंडमध्ये अनेक नामवंत व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली. सुरुवातीला चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या बायोपिकची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर हळूहळू हा प्रवास क्रीडाक्षेत्रापर्यंत येऊन पोहोचला. त्यामुळे आता दिग्गज कलाकार आणि क्रीडापटूंच्या जीवनाचा बायोपिकच्या माध्यमातून खुलासा झाला आहे. हाच प्रवास आता राजकीय क्षेत्राकडे वळला आहे. काही दिवसांपूर्वी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’, ‘ठाकरे’ हे राजकीय व्यक्तीमत्वांवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांनंतर आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान मोदी यांची भूमिका वठविणार असून चित्रपटातील आणखी एका व्यक्तीरेखेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या तरुणपणीच्या भूमिकेत विवेक ओबेरॉय झळकणार असून आता चित्रपटातील एक एक व्यक्तीरेखा समोर येत आहे. या चित्रपटातील महत्वाची व्यक्तींपैकी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जशोदाबेन यांच्या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. अभिनेत्री बरखा बिष्ट ही जशोदाबेन यांची भूमिका साकारणार आहे.

‘जशोदाबेन यांची भूमिका माझ्यासाठी खरंच आव्हानात्मक आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पत्नीविषयी फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळे त्यांच्या इतिहास प्रेक्षकांसमोर सादर करणं माझ्यासाठी फार चॅलेंजिंग आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण अहमदाबाद येथे होणार असून मी चित्रपटासाठीची तयारी सुरु केली आहे. सध्या मी गुजराथी भाषा शिकत आहे’, बरखाने सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या बायोपिकच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उमंग कुमार यांनी उचलली आहे. उमंग यांनी यापूर्वी ‘मेरी कोम’च्या बायोपिकचंही दिग्दर्शन केलं आहे. ‘मेरी कोम’ हा चित्रपट प्रदर्शनांनंतर लोकप्रिय ठरला होता. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा बायोपिकदेखील प्रेक्षकांच्या पसंतीत उतरेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.