News Flash

अपयशी ठरत असल्यामुळे निर्मात्याने मागितली होती जन्मपत्रिका – विद्या बालन

जन्मपत्रिका मागितल्यानंतर विद्याच्या वडिलांनी निर्मात्याला दिलं होतं 'हे' उत्तर

‘सुलू’ असो किंवा मग ‘बेगमजान’ प्रत्येक भूमिकेला तितक्याच प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर उतरवणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. अनेक वेळा बॉडीशेमिंगच्या मुद्द्यावर आपलं मत परखडपणे मांडणाऱ्या विद्याने आजवर तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. त्यामुळेच आज लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश करण्यात येतो. आज विद्याचा चित्रपटातील अभिनय पाहून तिला काम मिळतं. मात्र एक काळ असा होता जेव्हा विद्याच्या पदरात अपयश येत होतं आणि हे अपयश पाहून एका चित्रपट निर्मात्याने चक्क तिच्याकडे जन्मपत्रिका मागितली होती. काही दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या जीवनातील ही महत्वाची घटना सांगितली.

काही दिवसापूर्वी विद्याची मुख्य भूमिका असलेला मिशन मंगल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचं संपूर्ण टीमने जोरदार प्रमोशन केलं होतं. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना विशेष उत्सुकता होती. त्यामुळेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यातच या चित्रपटाच्या निमित्ताने विद्याची एक मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये तिने तिहेरी तलाक, बॉडी शेमिंग सारख्या अनेक मुद्द्यांवर तिचं मत मांडलं. त्यातच तिला मिशन मंगल आणि देशात जन्म पत्रिकेमध्ये असलेल्या मंगळावरुन असणारे समज-गैरसमज याच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तिने तिला करिअरच्या सुरुवातीला जन्मपत्रिकेसंदर्भात जो अनुभव आला तो सांगितला.

“एकीकडे देशात वैज्ञानिक मंगळ मोहीम यशस्वी करण्याच्या चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे आपल्याच देशामध्ये अनेक जण जन्मपत्रिकेमध्ये असलेल्या मंगळावर अडकून पडले आहेत. अनेकांचं असंही मत आहे की ज्यांच्या पत्रिकेत मंगळ असतो त्याचं लग्न ठरण्यास अडचणी येतात. त्याबद्दल काय सांगशील?”, असा प्रश्न विद्याला विचारण्यात आला होता. त्यावर विद्याने तिचं मत मांडलं.

“या मुद्द्यावर मी एवढंच सांगेन की, जसे विचार आणि श्रद्धा असते, तसेच त्याचे परिणामही असतात. जर तुम्ही चांगले विचार केले तर त्याचे चांगले परिणाम होती. सगळे परिणाम हे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतात”, असं विद्या म्हणाली.

पुढे ती म्हणते, “तुम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे का? ज्यावेळी मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये करिअरची सुरुवात करत होते. त्यावेळी मला अनेकदा अपयश सहन करावं लागलं होतं. त्यामुळे एका चित्रपट निर्मात्याने चक्क माझ्या वडिलांकडे माझी जन्मपत्रिका मागितली होती. निर्मात्याची ही मागणी ऐकल्यानंतर माझे वडील प्रचंड संतापले आणि त्यांनी पत्रिका देणार नसल्याचं ठणकावून सांगितलं. तुम्हीच सांगा जर आम्ही त्यावेळी पत्रिका आणि ग्रह-तारे या साऱ्यामध्ये अडकून बसलो असतो, तर आज काय झालं असतं. आपण कायम आपली ताकद, क्षमता आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे”.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित झालेला ‘मिशन मंगल’ हा चित्रपट भारताच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो ‘मिशन मंगल’ या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्या व्यतिरिक्त विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, कृति कुल्हारी हे कलाकार झळकणार आहेत. मंगळयान मोहिमेतील प्रमुख वैज्ञानिक राकेश धवन आणि त्यांचे सहकारी तारा शिंदे, एका गांधी, कृतिका अग्रवाल, वर्षां गावडा, नेहा सिद्दीकी, परमेश्वर नायडू, अनंत आयर आदी वैज्ञानिकांना हा चित्रपट म्हणजे एक मानवंदना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 1:38 pm

Web Title: actress vidya balan talks about her films and bollywood career ssj 93
Next Stories
1 आलिया भट्टच्या मैत्रिणीशी असलेल्या कथित नात्याबद्दल के. एल. राहुल म्हणतो..
2 नरेंद्र दाभोलकरांचा खून आजही पचवता येत नाही- सोनाली कुलकर्णी
3 अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू थिरकला शाहरुखच्या गाण्यावर, पाहा व्हिडीओ
Just Now!
X