मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सतत बदल होत असतात. कधी कथा, पटकथा यात वैविध्य येते तर कधी एखादा वेगळाच प्रयोग चित्रपटांत केला जातो. एखादा चित्रपट बनवण्यासाठी चित्रपटाशी निगडीत प्रत्येकजण तेवढीच मेहनत घेत असतो. पण तरीही चित्रपटातील अभिनेत्रीपेक्षा अभिनेत्याला अधिक मानधन मिळते असे बोलले जाते. हे फक्त मराठी चित्रपटसृष्टीतच होते असे नाही बॉलिवूडमध्येही याच समस्येला अनेकांना सामोरे जावे लागते. लोकसत्ता फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये महेश कोठारी आणि आदिनाथ कोठारी आले असता त्यांना अभिनेत्यापेक्षा अभिनेत्रीला मानधन का कमी मिळते असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा महेश कोठारे म्हणाले की, आता नायक आणि नायिका यांच्या मानधनातील भेदभाव आताच्या घडीला राहिलेला नाही. पूर्वी चित्रपटसृष्टीमध्ये असणारी परंपरा पूर्णपणे बदललेली असून मानधनासंबंधी कोणतेही मापदंड आता राहिलेले नाहीत. चित्रपटसृष्टीमध्ये पूर्वी अशी परिस्थिती नक्की होती. पण सध्याच्या घडीला अशा पद्धतीने मानधनामध्ये भेदभाव केला जात नाही. कोणताही कलाकाराला मानधनाची मागणी करण्याचे एक स्वतंत्रताच दिसत आहे. आदिनाथनेही त्याचे मत यावेळी व्यक्त केले.

आता अनेक स्त्रीप्रधान चित्रपट बनत आहेत. त्यावरुन अभिनेत्रींनाही तेवढेच मानधन मिळते असे मला वाटते. जर असे नसते तर स्त्रीप्रधान चित्रपट बनले नसते. या बाप- लेकाच्या जोडीने काही भूतकाळातल्या आठवणींनाही उजाळा दिला. लक्ष्मीकांत बर्डे आणि अशोक सराफ या जोडीला घेऊन धुमधडाका चित्रपटातली एक आठवण त्यांनी सांगितली. तसेच नंतर काही कारणास्तव अशोक सराफसोबत चित्रपट काढणे शक्य झाले नाही, असेही महेश कोठारे म्हणाले. मात्र धुमधडाका या चित्रपटानंतर शुभ मंगल सावधान या चित्रपटामध्ये अशोक सराफ माझ्यासोबत पुन्हा काम करायला आल्याचा आनंद झाला होता, असेही महेश कोठारे यावेळी म्हणाले. शुभ मंगल सावधान या चित्रपटातून अशोक सराफ परत आल्याचा आनंद सांगताना त्यांनी आपल्या सूनेचा उर्मिला आणि आदिनाथच्या प्रेमाचा एक किस्सा शेअर केला. अशोक सराफ ज्या चित्रपटातून माझ्याकडे परत आला त्याच चित्रपटातून मला एक नवीन अभिनेत्री मिळाली. उर्मिलाचा तो पहिला चित्रपट होता. पण खरी संधी तर आदिनाथने साधली, असे म्हणत त्यांनी आदिनाथ आणि उर्मिला यांच्या प्रेमकहाणीचा किस्सा सांगितला.

महेश कोठारे सध्या कॉमेडीची बुलेट ट्रेनमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक भागात उत्कृष्ट परफॉम करणारी जोडी माझी फेवरेट असते, असे सांगताना त्यांनी प्रसाद आणि संदीप या जोडीला अधिक गुण दिल्याचेही ऐकायला मिळाले.