कलर्स मराठीवरील ‘दोन स्पेशल’च्या मंचावर या आठवड्यामध्ये लोककलेची पिढीजात परंपरा यशस्वीरित्या सांभाळणारे आजचे आघाडीचे, प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे येणार आहेत. हे दोघं एकत्र येणार म्हणजे गाणी सादर होणारच. या कार्यक्रमात आदर्शने ‘देवा तुझ्या गाभार्याला’ हे गाणे सादर केले आहे. तर उत्कर्षनेही काही गाणी सादर केली. गाण्यांसोबतच ‘दोन स्पेशल’च्या मंचावर बालपणीच्या आठवणींचीही मैफल जमली.
कार्यक्रमाचा सूत्रसंचालक जितेंद्र जोशीने विचारले, “तुमच्या दोघांपैकी आनंद शिंदे यांचा लाडका कोण?” यावर आदर्शने लागलीच उत्तर दिले की, “उत्कर्ष जास्त लाडका आहे.” यामागचं कारणही त्याने सांगितलं. दोन भावांनी एकमेकांबद्दलच्या अशा अनेक मजेशीर आठवणी, किस्से या एपिसोडमध्ये सांगितले आहेत.
आणखी वाचा : ‘दबंग ३’मध्ये झळकणार मांजरेकर कुटुंब
कार्यक्रमात जितेंद्रने जेव्हा उत्कर्षला आई-वडिलांचा एक फोटो दाखवला, त्यावर उत्कर्ष म्हणाला, “माझ्या आईचं हास्य दिलखुलास आहे. तिचं वडिलांवर खूप प्रेम आहे. ती आजसुद्धा माझ्या वडिलांना हाताने जेवण भरवते.” यावेळी आदर्शने उत्कर्षची गाणी सुपरहिट का होतात, यामागचे रहस्यसुद्धा सांगितले. गप्पांदरम्यान या दोघांमध्ये प्रश्नोत्तरांचा खेळसुद्धा रंगला. कधी ब्रेकअप झालं आहे का, असा प्रश्न या दोघांना विचारण्यात आला. त्यावर हे दोघं काय म्हणाले हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘दोन स्पेशल’चा हा विशेष भाग ६ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 3, 2019 3:21 pm