निलेश अडसूळ

एखाद्या कलाकाराचं अभिनयापलीकडचं विश्व काय आहे याची अनेकदा चाहत्यांना कल्पना नसते. कोणी सामाजिक कामाशी जोडलेलं असतं तर कोणी शैक्षणिक किं वा राजकीय. पण सगळ्या गोष्टी एकहाती सांभाळणारा अवलिया क्वचितच कोणी एखादा असतो. असाच एक कलाकार गेली २५ वर्षांहून अधिक काळ कलाक्षेत्रात वावरत आहे. कलाक्षेत्रच नाही तर त्यासोबत नाना जबाबदाऱ्या लीलया पेलणारा हा नट म्हणजे आदेश बांदेकर. गेली १६ वर्ष झी मराठीवरील होम मिनिस्टर या मालिकेतून सूत्रसंचालक म्हणून काम करत असताना ते अवघ्या महाराष्ट्राचे भाऊजी झाले. आता महाराष्ट्रातल्या वहिनींचा सन्मान करून भाऊजी भारत दौऱ्यासाठी निघाले आहेत.

लालबागमधल्या अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात दरवर्षी आदेश बांदेकर यांची पावलं थिरकताना दिसतात. आज प्रसिद्धीच्या झोतात असतानाही सामान्यांमध्ये मिसळून जाण्याच्या या वृत्तीविषयी आदेश सांगतात, जडणघडण गिरणगावात झाल्याने चाळसंस्कृतीचे संस्कार आजही माझ्यात जिवंत आहेत. कोणतंही रक्ताचं नातं नसताना एकमेकांसाठी धावून जाणारी माणसं मी पहिली आहेत. सताड उघडी राहणारी दारं, माझ्यावर प्रेम करणाऱ्या पवार मावशी, साळवे मावशी, जाधव काकी, भिसे काकी, बनसोडे कुटुंबीयांकडे सर्वानी एकत्र मिळून पाहिलेला टीव्ही त्यामुळे मनाचा मोठेपणा म्हणजे काय हे या चाळसंस्कृतीने शिकवलं. आणि याच चाळीत आपले कलागुण दाखवत, गणेशाच्या मिरवणुकीत मनसोक्त नाचत हा आदेश कलाक्षेत्रात गेला, असेही ते सांगतात.

अभिनयाकडे वळायचे तसे नक्की नव्हते, पण एकदा राज्य नाटय़ स्पर्धेच्या निमित्तानं अभिनयाची संधी मिळाली आणि त्याच वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला. पुढे राज्य नाटय़, कामगार कल्याण, प्रायोगिकच्या माध्यमातून काम सुरू ठेवले. पण शाहीर साबळेंच्या लोकधाराने आयुष्याला खरी कलाटणी मिळाली, असे ते सांगतात. परंतु व्यावसायिक रंगभूमीवर येण्यासाठी मंगेश दत्त यांची विशेष मदत झाल्याचेही ते अधोरेखित करतात. लोकधारेतून नाच करत असताना, मी नाचापलीकडे जाऊ न व्यावसायिक रंगभूमीवर अभिनय करावा असे मंगेशला वाटले आणि त्याच्यामुळेच पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘मुंबई मुंबई’ हे पहिले व्यावसायिक नाटक मला मिळाले. मग ‘टुरटुर’, ‘बिघडलंय स्वर्गाचे दार’, ‘मंगलगाणी दंगलगाणी’च्या माध्यमातून प्रवास पुढे सरकत गेल्याचे भाऊ जी सांगतात.

एकीकडे हा प्रवास सुरू असतानाच ११९०-९५९५च्या दम्यान दूरदर्शनमध्ये साहाय्यक म्हणून काम करण्याची संधी नीना राऊ त यांनी दिली. ध्वनिफितींची नोंद करत असतानाच एकदा ‘ताक धीना धिन’ कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू होती. निवेदकाच्या गैरहजेरीमुळे टेस्टिंगसाठी मी उभा राहिलो . त्याच वेळी नीनाताईंनी विश्वास ठेवत निवेदनाची धुरा माझ्यावर सोपवली. त्यानंतर तब्बल सहा वर्ष ती जबाबदारी मी निष्ठेने पार पाडली. हे करत असताना आदेश पालिका रुग्णालयातही कार्यरत होते. त्याविषयी ते सांगतात, एका बाजूला निवेदन तर दुसऱ्या बाजूला नोकरी असे दुहेरी काम सुरू होते. भाभा रुग्णालयात रुग्णांना केसपेपर तयार करून द्यायचे काम मी तेव्हा करत होतो. ते करत असताना रुपारेल महाविद्यालयाचे एकांकिकांचे दिग्दर्शनही केले. त्याच दरम्यान मुंबई विद्यापीठात सांस्कृतिक समन्वयक म्हणून माझी निवड करण्यात आली. या सगळ्या गोष्टी एकत्र हाताळताना मोठी कसरत व्हायची, पण प्रत्येक गोष्टीला योग्य न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. येईल ते काम करायचं हे धोरण निश्चित केलं होतं त्यामुळे कामाचा कधी कंटाळा वाटला नाही असे ते सांगतात.

तर ज्या वाहिनीवर आज ते आपल्याला दिसतात त्या वाहिनीशी असलेलं त्यांचं नातं सांगताना ते म्हणाले, २००० साली ‘ताक धीना धिन’ बंद झाल्यावर भारतकुमार राऊ त यांनी अल्फा गौरवचा समन्वयक म्हणून काम करशील का असे विचारले आणि त्यानिमित्ताने ‘झी’ समूहात माझा प्रवेश झाला. त्या वेळी कलाकारांशी बोलण्यासाठी झी समूहाने मला पाहिलं सिम कार्ड दिलं आणि गेली वीस वर्ष त्याच नंबरहून माझा संपर्क सुरू आहे, असेही ते अभिमानाने सांगतात. आपली मेहनतीची तयारी असेल तर यशाची वाट सापडत जाते असेच काहीसे बांदेकरांच्या आयुष्यात घडले. समन्वय करता करता ते अल्फा गौरवचे दिग्दर्शक झाले तर काही मालिकांमधून अभिनय सुरू होता. यातूनच होम मिनिस्टरसारखा कार्यक्रम बांदेकरांना मिळाला आणि अवघ्या महाराष्ट्राचे ते भाऊ जी झाले. ‘आता जरी हे स्वप्नवत वाटत असलं तरी यामागे खूप खडतर प्रवास होता आणि हो हे मी करू शकलो ते केवळ सुचित्रामुळे. तिचा विश्वास आणि सोबत नसती तर हे शक्य झालं नसतं,’ असे भाव आपल्या पत्नीविषयी आदेश व्यक्त करतात.

‘होम मिनिस्टर’च्या काही अविस्मरणीय अनुभवाविषयी ते सांगतात, या कार्यक्रमात केवळ पैठणीचा खेळ नसून ते गृहिणींना व्यक्त होण्यासाठी दिलेलं हक्काचं व्यासपीठ आहे. या माध्यमातून तिच्याकडे बघण्याचा कुटुंबाचा दृष्टिकोन बदलताना, आत्मसन्मान प्राप्त करताना दुरावलेल्या अनेक कुटुंबांना एकत्र येताना मी पाहिलं आहे. त्या मला भाऊ जी म्हणत असल्या तरी घरातली प्रत्येक व्यक्ती माझ्यात एक नातं शोधू पाहते. एखादी आजी थरथरत्या हाताने दृष्ट काढते, मला पाहून कुणाला आजारपणात दिलासा मिळतो, हरवलेल्या बहिणी एकत्र येतात, अचेतन असलेली मुलगी हालचाल करायला लागते, काही गृहिणी मला फोन करून सांगतात आमच्या यांना जरा व्यसनातून बाहेर पडायला सांगा. त्यामुळे दीर आणि भाऊ  यांचा समन्वय साधणारा हा भाऊ जी आहे आणि त्याच नात्याला न्याय देण्याचा सोळा वर्षांत प्रयत्न करत आलो आहे, असे ते सांगतात. तर होम मिनिस्टरची सर्व टीम एक कुटुंबासारखी माझ्यासोबत उभी आहे. प्रत्येक जण आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत असल्याने कधीही रिटेक घ्यायची गरज लागत नाही. या शब्दात ते आपल्या टीमचं कौतुक करतात. सध्या दिल्ली, इंदूर, अहमदाबाद, हैद्राबाद येथील चित्रीकरणाच्या गमती सांगताना ते म्हणाले, ज्या ज्या राज्यांमध्ये जातोय तिथला पेहराव मला दिला जातो. अनेकदा वहिनींच्या आग्रहाखातर तो पेहराव करून चित्रीकरण करावे लागते. तिथल्या भाषा, संस्कृती आणि त्यात जपलेलं मराठीपण हे पाहताना ‘महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र’ पाहतोय अशी भावना येते. पुढे ते म्हणाले, आज कुठेही गेलो की लोक फोटो घेतात, भेटतात, पण कधीच त्यांना अडवावंसं वाटत नाही, कारण मीही तशाच एका सामान्य कुटुंबातून आलो आहे याची जाणीव मनात आहे. चाळीतले संस्कार आजही जिवंत आहेत. विमानात बसून आज आकाशात भरारी घेणं जरी सहज शक्य असलं तरी पाय जमिनीवरच आहेत आणि ते कायम राहतील.

*  पैठणीमागील कथा

होम मिनिस्टर हा केवळ १३ भागांसाठी सुरू झालेला कार्यक्रम होता. त्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. तेव्हा आमची परिस्थिती अगदी बेताची होती. त्यामुळे काटकसर करून पैसे साठवण्याकडे सुचित्राचा अधिक कल असायचा. एकदा साठवलेल्या भिशीच्या पैशातून काय घेणार असं तिला विचारलं तर ती म्हणाली पैठणी घेणार, कारण पैठणी हे प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं. जर एखादी स्त्री पैठणीसाठी पैसे साठवते म्हणजे ती फक्त साडी नसून त्या तिच्या भावना आहेत हे मला कळून चुकलं. दुसऱ्या दिवशी हाच प्रसंग मी वाहिनीप्रमुखांना सांगितला. त्या दिवशी ही पैठणी घराघरात पोहोचवायची आम्ही निश्चित केलं आणि तेरा भागांसाठी सुरू झालेल्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने आज सोळा वर्षांचा टप्पा पूर्ण केला.

* वेळेचे गणित

होम मिनिस्टर, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, अंधेरी स्पोर्ट्स क्लब, चित्रपट सेना, सोहम प्रॉडक्शन अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना कुटुंबाशीही मी तितकोच जोडला गेलो आहे. अगदी सुचित्रा आणि सोहमी यांच्यापलीकडे कुटुंबातल्या प्रत्येकाची मी दखल घेतो. या क्षेत्रात कुटुंबीयांचे सहकार्य अधिक महत्त्वाचे असते. एकदा सोहमच्या मित्राने त्याला विचारलं, तुझे बाबा तुम्हाला वेळ देतात का? त्यावर सोहम म्हणाला, ते आम्हाला ‘क्वांटिटी नाही तर क्वॉलिटी टाइम देतात.’ त्याचं हे उत्तर काम करण्याचं अधिक बळ देऊ न गेलं, असे आदेश सांगतात.

* सामान्य गृहिणीच प्रेरणास्थानी

होम मिनिस्टरच्या माध्यमातून अनेक घरांमध्ये गेलो. त्यापैकी सर्वसामान्य घरातील गृहिणी मला कायमच प्रेरणा देऊ न जातात. नवऱ्याचा तुटपुंजा पगार, संसार चालवण्यासाठी सुरू असलेली तिची धावपळ, काटकसर, मुलांचे शिक्षण, नातेवाईकांचे सोहळे हे सगळं ती सक्षमपणे पेलत असते. यात कसलीच तक्रार न करता आल्या गेल्या प्रत्येकाला ती भरल्या पोटाने निरोप देते. इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तिला वाटणारं समाधान काही और आहे. त्यामुळे तिच्याकडे असलेला जगण्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अनन्यसाधारण आहे. म्हणूनच त्या सर्व माऊली माझ्या प्रेरणास्थानी आहेत.

* सुचित्रासाठी खंत

ज्या वेळी आमचं लग्न झालं तेव्हा माझ्या हातात फारसं काही नव्हतं, पण त्या वेळी सुचित्राने दाखवलेला विश्वास मला इथपर्यंत घेऊन आला. आमच्या २५व्या लग्नाच्या वाढदिवसाला माझे वडील म्हणाले, तुम्ही ज्या काळात लग्न केलं, तेव्हा सुचित्रा माझी मुलगी असती तर मी तुला कधीच दिली नसती. जेव्हा लग्न झालं तेव्हा अभिनेत्री म्हणून सुचित्राचं काम जोरदार सुरू होतं, पण तिने कधी याचा गर्व बाळगला नाही. आज माझ्याकडे पाहून तिला अभिमान वाटतो की, मी तिचा विश्वास सार्थ ठरवला. आजही ती मला अनेक गोष्टी शिकवत असते किंबहुना कुटुंबाची जबाबदारी अध्र्याहून अधिक तिच्यावरच आहे. या प्रवासात कुटुंबाकडे लक्ष देताना तिचा अभिनय, तिची कला कुठे तरी मागे राहिली, अशी खंत भाऊजी व्यक्त करतात. शिवाय तिला साजेशी भूमिका ज्या दिवशी तिला मिळेल त्या दिवशी सर्वाधिक आनंद मला झालेला असेल असेही ते सांगतात.

* आजचा तरुण शांततेच्या प्रेमात

सध्याच्या सामाजिक राजकीय परिस्थिती पाहता घडणाऱ्या अनुचित घटनांचा विरोध करण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरत आहेत. ते जरी आंदोलन करत असले तरी त्यामागच्या अपेक्षा शांततेच्या आहेत. ते सतत चर्चेसाठी तयार असतात आणि चर्चाना प्राधान्य देऊन मार्ग काढणे सहज शक्य आहे. यावरच तरुण शांततेच्या प्रेमात असल्याचे दिसते आणि त्याच शांततेसाठी त्यांचा लढा आहे जो प्रत्येकाने समजून घ्यायला हवा.