सिनेमा ओनर्स असोसिएशन ऑफ इंडियाने महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटक राज्यात सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये ‘ऐ दिल है मुश्किल’ प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. याचे कारण म्हणजे या सिनेमात पाकिस्तानी कलाकार फवाद खान याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. उरी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांनी काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण, सरकारने असे कोणतेही निर्बंध घातले नसले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर संघटनांनी हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये लागू न देण्याचा निर्णय घेतला आहे. जर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला तर तोडफोड करण्याची धमकीही देण्यात आली आहे.

राजकीय पक्षांनी आणि काही संघटनांनी घेतलेल्या या पावित्र्यामुळे बॉलिवूडमधूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ‘ऐ दिल है..’चा निर्माता करण जोहरनेही भविष्यात पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी या सिनेमाशी निगडीत विवाद काही कमी होत नाहीएत. गुरुवारी मामी फिल्म महोत्सवात बॉलिवूड अभिनेता अभय देओलनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, मी सरकारला गांभीर्याने घेत नाही. कारण ते फक्त आम्हा कलाकारांनाच काम करण्यावर बंदी घालत आहेत. कोणत्याही व्यापारावर मात्र त्यांनी बंदी घातली नाही. आता तर असं वाटत आहे की त्यांनी हे मुद्दाम केले आहे. यामुळे तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळते आणि त्या घटनेचा गाजावाजाही होतो. पण या सगळ्याला काय अर्थ आहे?

पुढे तो म्हणाला की, जर तुम्हाला पाकिस्तानच्या कोणत्या गोष्टींवर बंदीच घालायची असेल तर सगळ्याच गोष्टींवर घाला. फक्त सिनेकलाकारांवर बंदी घालू नका. तुम्ही अर्धवट कामं का करत आहात? व्यावसायिक करारांवरही बंदी घाला.’ अभय देओलच्या या वक्तव्याने तो सोशल मीडियावर ट्रेण्डमध्येही आला. नेटिझन्सनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. भारतने या हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकही केला. पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ल्यांना समर्थन देण्यावरुन पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली. मनसेने पाकिस्तानी कलाकारांना मायदेशी परतण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. चित्रपटगृह मालकांनीही करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.