अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरू झाला. या वादावर आता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनने वक्तव्य केलं आहे. घराणेशाहीपेक्षा बॉलिवूडमध्ये गटबाजी व मक्तेदारीचा त्रास अधिक आहे, असा खुलासा त्याने केला आहे. मक्तेदारीमुळे माझे अनेक चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाही, असा आरोप त्याने केला आहे.

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अध्ययन म्हणाला, “अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीत गटबाजी व मक्तेदारी आहे. माझ्यासोबतही अन्याय झालाय. माझे १४ चित्रपट रखडले आणि माझ्या चित्रपटांच्या कमाईचा आकडा चुकीचा दाखवण्यात आला. लोकांनी याकडे कधीच लक्ष दिलं नाही. या गोष्टी समोर येण्यासाठी आत्महत्येसारखी घटना घडावी लागते हे दुर्दैवी आहे. जे लोक घराणेशाहीबद्दल बोलत आहेत आणि भांडत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की त्याऐवजी इंडस्ट्रीमधल्या गटबाजीबद्दल बोला आणि त्याच्याविरोधात लढा. ”

अध्ययनचे वडील व अभिनेते शेखर सुमन यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक कलाकारांनी बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर टीका केली आहे.