बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रामायण या पौराणिक कथेवर आधारित आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात रावणाची मानवीय बाजू दाखवण्यात येईल अशी घोषणा सैफ अली खानने केली होती. या वादग्रस्त वक्तव्यामुळे सैफवर टीका केली जात होती. सैफने त्यानंतर माफीदेखील मागितली होती. मात्र आता आदिपुरूषचे संवाद लेखक मनोज मुंटाशीर यांनी सैफच्या वक्तव्यावर त्यांचं मत मांडलं आहे.

मिड – डे ला दिलेल्या मुलाखतीत मनोज मुंटाशीर म्हणाले, “रावणाविषयी केलेल्या वक्तव्यावरून सैफला ट्रोल करण्यात आले होते. पण चित्रपटात आक्षेपार्ह असं काही नाही. सैफचा गैरसमज झाला. रावण हा एक दुष्ट व्यक्ती म्हणून ओळखला जातो, परंतु आमच्या चित्रपटात त्याच्या सर्व बाजू दाखवण्यात येणार आहेत.”

काय म्हणाला होता सैफ अली खान?

सैफ अली खान ‘आदिपुरुष’ या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफने या भूमिकेवर भाष्य केले होते. “रावणाला आतापर्यंत आपण केवळ खलनायकाच्या भूमिकेत पाहिले आहे. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता? याचं चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रावणाने भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केले हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याला देखील एक पार्श्वभूमी होती. रामाचे भाऊ लक्ष्मण यांनी शूर्पणखाचं नाक कापलं होतं. त्यानंतर हे युद्ध होणारंच होते. या चित्रपटात रावणाची विचारसरणी काय होती हे दाखवले जाणार आहे” असे सैफ म्हणाला होता.

आणखी वाचा- इरफानच्या आठवणीने शूजित सरकार भावूक

या चित्रपटात प्रभास प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सनॉन माता सीतेची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे. हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. ११ ऑगस्ट २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.