आदित्य पांचोली आणि त्याच्या कुटुंबियांवर जुहू येथील राहते घर सोडण्याची वेळ आली आहे. सदर बंगल्यात वास्तव्य कायम ठेवण्यासाठी पांचोलीने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना बंगला सोडण्याचे आदेश दिले आहेत.

नक्की वाचा :- हीरो नव्हे झीरो
गेल्या तीस वर्षात तीन वेगवेगळ्या न्यायालयांत पांचोलीने याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, या तिनही न्यायालयांनी पांचोलीची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आता आदित्य पांचोली सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेणार असल्याचे कळते. जुहूच्या इस्कॉन मंदिराजवळ पांचोलीचा बंगला असून १९६० सालापासून त्यांचे कुटुंबिय दीडशे रुपये महिन्याप्रमाणे भाड्यावर तेथे राहत आहेत.

मात्र, तीन महिन्यांचे भाडे थकल्यामुळे या बंगल्याच्या मालकीण ताराबाई हाटे यांनी पांचोलींविरोधात १९७७ साली खटला दाखल केला होता. आदित्य पांचोलीचे वडिल राजन आणि बंगल्याच्या मालकीण यांच्यात त्यावेळी पत्रव्यवहार झाला होता. त्यानुसार ‘थकित भाड्याचे पैसे लवकरच दिले जातील’ असे राजन यांनी पत्रात म्हटले होते. पण, त्यानंतर पांचोली कुटुंबियांनी कुठल्याही प्रकारे भाड्याचे पैसे न दिल्याने उच्च न्यायालयाने त्यांना बंगला सोडण्याचे आदेश दिले आहेत.