11 December 2017

News Flash

कंगनासोबतच्या माझ्या वादाशी ‘त्याचा’ काहीच संबंध नाही- आदित्य पांचोली

कोणीतरी तिच्या खोटेपणाला आळा घालण्याची गरज आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 13, 2017 1:31 PM

आदित्य पांचोली, कंगना रणौत

कंगना रणौतच्या खासगी आयुष्याविषयी सध्या बऱ्याच चर्चा रंगत आहेत. आदित्य पांचोली, हृतिक रोशन, अध्ययन सुमन यांच्यासोबत कंगनाचा वाद आणि दरदिवशी त्याला मिळणारं नवं वळण या साऱ्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. एका मुलाखतीत कंगनाने आदित्य पांचोलीवर बरेच आरोप लावले होते. बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये असताना आपण आदित्य पांचोलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचंही तिने स्पष्ट केलं होतं. त्यावेळी आदित्यने घरात डांबून एक प्रकारे नजरकैदेत ठेवून आपलं शोषण केल्याचंही तिने सांगितलं होतं. या सर्व आरोपांनंतर आदित्य पांचोली आणि त्याची पत्नी झरिना वाहाबने तिच्याविरोधात आवाज उठवत अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला.

आदित्यच्या या तक्रारीमध्ये हृतिकचा काही संबंध असणार का, हाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जाऊ लागला. त्याचं उत्तर खुद्द आदित्यनेच दिलं आहे. ‘पिंकव्हिला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आदित्यने कंगनाविरोधात घेतलेल्या या निर्णयाशी हृतिकचा काहीच संबंध नाही. ‘मी कंगनावर रागवलो नसलो तरीही तिच्या वक्तव्याने दुखावलो आहे’, असं आदित्यने स्पष्ट केलं.
आपल्या कुटुंबीयांनाही या वादात खेचल्यामुळे कंगनावर त्याने आगपाखड केली. याविषयी अधिक माहिती देत तो म्हणाला, ‘हृतिक आणि

कंगनाच्या सध्या सुरु असणारा वाद आणि माझा निर्णय यांचा काही संबंध नाही. हृतिकला काय करायचं आहे याचा निर्णय तो स्वत: घेतोय. पण, मी मात्र या प्रकरणी आता शांत राहणार नाही. मी काहीही चुकीचं कृत्य करत नसून माझ्या कुटुंबीयांविषयी कंगना अशा प्रकारे वक्तव्य करु शकत नाही. माझ्या कुटुंबाची बाजू घेण्यासाठी आणखी कोण पुढे येणार? कोणीतरी तिच्या खोटेपणाला आळा घालण्याची गरज आहे आणि ते फक्त कायदेशीरित्याच शक्य आहे.’

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

एका मुलाखतीमुळे कंगना रणौतने पुन्हा एकदा अनेक कलाकारांचा रोष ओढावला आहे. सोशल मीडियापासून ते चित्रपट वर्तुळांपर्यंत तिच्याविषयीच्याच चर्चा रंगत आहेत. तेव्हा आता या परिस्थितीत आणखी कोणतं नवं वादळ कंगनावर धडकणार हाच प्रश्न उपस्थित होत आहे.

First Published on October 13, 2017 1:25 pm

Web Title: aditya pancholi says hrithik roshan has nothing to do with in context of complaint against kangana ranaut