भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर गायक-संगीतकार अदनान सामी याला काही पाकिस्तानी ट्विटर युजर्सने काही खोचक प्रश्न विचारले. या प्रश्नांना अदनानने अशी काही उत्तरं दिली की त्या युजर्सची बोलतीच बंद झाली. मात्र, आपल्या उत्तराने अदनाने सर्व चाहत्यांची मनंही जिंकली.

भारताचा स्वातंत्र्य दिन हा १५ ऑगस्टला असतो तर पाकिस्तानचा १४ ऑगस्टला. त्यामुळे १४ ऑगस्टला ट्विटरवर पाकिस्तानी नागरिक त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत होते. त्यातच एका असीम अली रझा नावाच्या पाकिस्तानी युजरने पूर्वाश्रमीचा पाकिस्तानी नागरीक असलेला मात्र आता भारतीय झालेल्या अदनान सामीला एक खोचक सवाल केला. तू स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छांचे ट्विट का करत नाहीस? असे या युजरने म्हटले. म्हणजेच पाकिस्तानच्या स्वांतंत्र्यदिनानिमित्त तू शुभेच्छा का देत नाहीस असे या युजरला सुचवायचे होते. मात्र, त्याच्या या खोचक सवालावर अदनानने तितकेच तडफदार आणि सुंदर उत्तर दिले. अदनान म्हणाला, मी उद्या स्वांतत्र्यदिनाच्या शुभेच्छांचे ट्विट करणार आहे. याचा अर्थ उद्या म्हणजे १५ ऑगस्ट अर्थात भारतीय स्वातंत्र्यदिनी मी शुभेच्छा देणार असा होता.

त्याचबरोबर आज सकाळी अदनानने स्वांतत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा…’ या गौरवगीताच्या ओळी लिहीत या काव्याचे रचनाकार मोहम्मद इक्बाल यांची त्याने आठवण काढली. यावर एका मोहम्मद शफीक नामक युजरने त्याला तुझ्या वडिलांचा जन्म आणि मृत्यू कुठे झाला? असा प्रश्न केला. त्यावर अदनानने पुन्हा एक तडफदार उत्तर दिले. त्याने म्हटले की, “माझ्या वडिलांचा जन्म १९४२ मध्ये भारतात झाला आणि २००९ मध्ये भारतातच त्यांचा मृत्यू झाला. आता पुढचा प्रश्न विचारा…” अशा शब्दांत त्याने या युजरलाही धुडकावून लावले.

अदनानच्या या उत्तरांवर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या समर्थनार्थ ट्विट करीत त्याचे मोठे कौतुक केले.