पाकिस्तानी गायक अदनान सामीला लवकरच भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहे. अदनान सामीने पाकिस्तानी नागरिकत्वाचा त्याग केला असून, केंद्र सरकार त्याला भारतीय नागरिकत्व देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर पाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना तीव्र विरोध करणारी शिवसेना यावर काय भूमिका घेते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अदनान सामी गेल्या १५ वर्षांपासून भारतात राहत आहे. त्याने बॉलीवूडच्या चित्रपटांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. काही दिवसांपूर्वी अदनानच्या व्हिसावरून वाद उफाळून आला होता. २००१ साली एका वर्षाच्या व्हिसासह भारतात आलेल्या अदनाने वेळोवेळी व्हिसाचे नूतनीकरण केले होते. मात्र त्याच्या पासपोर्टची मुदत संपल्यानंतर पाकिस्तानी अधिका-यांनी त्याच्या नूतनीकरणास नकार दिला. त्यानंतर अदनानने गेल्या मे महिन्यात गृहमंत्रालयातील अधिका-यांची भेट घेऊन आपल्याला पाकिस्तानमध्ये पाठवले जाऊ नये अशी मागणी केली. तेव्हा अदनानला अनिश्चित कालावधीसाठी भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मानवतावादी भूमिकेतून त्याची ही मागणी मान्य करण्यात आली होती. कायद्यानुसार विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता या क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची सोय आहे. त्यामुळे सरकार अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.