गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा वाद पेटून उठला आहे. त्याचबरोबर आता पुरस्कार सोहळे, पुरस्कार सोहळ्यामधील कॅटेगिरी आणि स्टार्सला पुरस्कार देण्याच्या पद्धतीवर प्रश्न विचारले जात आहेत. यासंदर्भात गायक अदनान सामीने एक ट्विट करत त्याचा अनुभव सांगितला आहे. त्याचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

सोशल मीडियावर एका पत्रकाराने पुरस्कार सोहळ्या मागील काही गोष्टींवर ब्लॉग लिहिला होता. तो तुफान व्हायरल झाला. त्यानंतर पुरस्कार सोहळ्यांविषयी अनेक प्रश्न विचारले जावू लागले. बॉलिवूड दिग्दर्शक शेखर कपूर यांनी देखील ट्विट करत काही प्रश्न विचारले. ‘बॉलिवूडमधील पुरस्कार सोहळे हे तुमचे कौशल्य पाहून दिले जात नाहीत. जर मी तुला एक पुरस्कार दिला तर तू माझ्यासाठी स्टेजवर डान्स करशील का?’ असे त्यांनी ब्लॉग शेअर करत ट्विटमध्ये म्हटले होते.

त्यांच्या या ट्विटला उत्तर देत अदनान सामीने ट्विट केले. ‘खरं आहे हे. मला देखील असाच एक अनुभव आला होता. जेव्हा त्यांनी मला फ्रीमध्ये परफॉर्म करण्यासाठी सांगितले होते आणि त्यासाठी ते मला पुरस्कार देखील देणार होते. मी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. मी एखादा पुरस्कार कधीच विकत घेणार नाही. एक पुरस्कार माझ्यासाठी माझा सन्मान आणि स्वाभिमान आहे’ अशा आशयाचे ट्विट अदनान सामीने केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण सुशांतने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याच्या निधनानंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. अनेक स्टारकीड्सला ट्रोल करण्यात आले. आता बॉलिवूडमधील पुरस्कार सोहळ्यांवर देखील प्रश्न विचारले जात आहेत.