पाकिस्तानी गायक अदनान सामीने जरी भारतीय नागरिकत्व स्वीकारले असले तरी मी पाकिस्तान हेच माझं घर असं वक्तव्य त्याचा मुलगा अझानने केलं आहे. याबाबत आजपर्यंत मोकळेपणाने न बोलण्यामागचं कारण वडील असून मी त्यांच्या मतांचाही आदर करतो, असं तो म्हणाला.

‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत अझान म्हणाला, ”मी आजपर्यंत या विषयावर बोललो नाही यामागचं कारण म्हणजे माझे वडील. मी त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा आदरसुद्धा करतो. कुठे राहायचं आणि कोणत्या देशाला आपलं घर म्हणायचं याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि त्या निर्णयांचा मी आदर करतो. पण मी कोणत्या देशाला माझं घर म्हणावं हा पूर्णपणे माझा प्रश्न आहे आणि मी पाकिस्तानमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.”

अझान संगीतकार असून तो बरीच वर्षे भारतात राहिला. याविषयी तो पुढे सांगतो, ”भारतात माझे खूप चांगले मित्र आहेत. मी बरीच वर्षे तिथे राहिलोय पण पाकिस्तान हे माझं घर आहे. मी जरी भारतात लहानाचा मोठा झालो तरी पाकिस्तानमधील इंडस्ट्री मला माझ्या कुटुंबासारखी वाटते.”

अझान हा अदनान व त्याची पहिली पत्नी झेबा बख्तियार यांचा मुलगा आहे. झेबा ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे. जम्मू व काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर भारत व पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पाकिस्तानी ट्रोलर्सना अदनाने सणसणीत उत्तर दिलं होतं. याबद्दल प्रश्न विचारला असता अझान म्हणाला, ”अदनान हे माझे वडील आहेत म्हणून अशा घटना घडल्यानंतर माझ्या अवतीभवती असणारे लोक कशाप्रकारे वागतात हे पाहणं फार रंजक असतं. नेहमी वेगवेगळ्या गोष्टींसाठी मेसेज करणारे लोक अशा वेळी एकदम गप्प बसतात. माझे बाबा माझ्यासाठी एका मित्रासारखे आहेत. अनेक गोष्टींवर मी त्यांचा सल्ला विचारात घेतो. जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा बऱ्याच विषयांवर गप्पा मारतो.”