समवयस्क मित्रांच्या कंपूत बऱ्याचदा चावट विनोद केले जातात. ‘सेक्स’ या विषयावर गप्पा आणि विनोदही रंगतात. अनेकदा आपण एखाद्याच्या बाबतीत ‘चावट आहे नुसता’ असेही म्हणून जातो. खासगी गप्पांमधला हा चावटपणा, बोल्डपणा आणि लैंगिकता उघडपणे व्यक्त झाली तर ते सभ्यपणाचे समजले जात नाही. हेच विनोद व ही लैंगिकता जर नाटकांमधून रंगभूमीवर व्यक्त झाली तर? मराठीत २५ ते ३० वर्षांपूर्वी अशा ‘हिट अ‍ॅण्ड हॉट’ नाटकांची लाट आली होती. रंगभूमीवर अलीकडच्या काही वर्षांतही ‘हिट अ‍ॅण्ड हॉट’नव्हे तर उघड उघड लैंगिकता आणि अश्लीलता असलेली नाटके दाखल होत आहेत. प्रेक्षकांचाही या बोल्ड आणि चावट नाटकांना प्रतिसाद मिळतो आहे..
मराठी रंगभूमीवर काही वेळेस एखाद्या विषयाची लाट येत असते. त्या लाटेत मग एकामागोमाग एक त्याच विषयांवरची नाटके सादर होतात. स्त्रियांचे प्रश्न, पौगंडावस्थेतील समस्या, विनोदी आणि अन्य काही विषय या नाटकांमधून हाताळले जातात. यात आता चावट, बोल्ड आणि अश्लीलता असणाऱ्या नाटकांची भर पडली आहे. रंगभूमीवर सध्या ‘एक चावट संध्याकाळ’, ‘एक चावट मधुचंद्र’ ही नाटके सुरू आहेत. नव्या वर्षांत ‘दोन बायका चावट ऐका’ हे नाटक एका मान्यवर नाटय़संस्थेकडून रंगभूमीवर सादर होत आहे. या नाटकांच्या जाहिरातींवर नजर टाकली तर वेगवेगळ्या नाटय़गृहात याचे प्रयोग लागलेले पाहायला मिळतात. नाटय़व्यवसायाशी संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार या नाटकांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर ‘जंगली कबुतर’, ‘हैदोस’, ‘भोगसम्राट’ अशा ‘हिट अ‍ॅण्ड हॉट’ नाटकांची लाट आली होती. तर त्या अगोदर सादर झालेल्या ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ (दोन्हींचे लेखक विजय तेंडुलकर), ‘अव्यक्त’ (चिं.त्र्यं. खानोलकर)या नाटकांनीही रंगभूमीवर वाद आणि वादळ निर्माण केले होते. अलीकडच्या काही वर्षांत अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या ‘एक चावट संध्याकाळ’ या नाटकाने पुन्हा एकदा लैंगिकतेवर आधारित विषयांना तोंड फोडले. ‘एक चावट संध्याकाळ’ या नाटकाची जाहिरातच ‘केवळ प्रौढ पुरुषांसाठी’ अशा प्रकारे केली गेली होती. या नाटकानंतर रंगभूमीवर ‘योनी’ असा शब्द असलेली काही नाटके सादर झाली. यात ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’, ‘त्या चार योनींची गोष्ट’, ‘गुपीत योनींच्या गुप्त गोष्टी’ अशा काही नाटकांचा समावेश होता. ही सर्वच नाटके अश्लील आणि चावट होती अशातला भाग नाही. त्यातून स्त्रियांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण नाटकाच्या नावांमुळे नाटकांकडे ‘त्या’ दृष्टीने पाहिले गेले. पुढे ‘पांढरपेशी वेश्या’, ‘अ‍ॅग्रेसिव्ह’ ही नाटकेही सादर झाली. यात ‘अ‍ॅग्रेसिव्ह’ नाटकाची जाहिरातही वादग्रस्त ठरली. मराठी नाटकाच्या जाहिरातीचा ‘पदर’ त्या निमित्ताने ढळला होता. या नाटकाच्या जाहिरातीत उघडी पाठ असलेली स्त्री दाखवण्यात आली होती.
काही वेळा असे दिसते की प्रेक्षक ज्या उद्देशाने अशा नाटकांना जातात तसे त्यांना नाटकात काहीच पाहायला मिळत नाही आणि त्यांचा अपेक्षाभंग होतो. केवळ नाटकांच्या नावामुळे प्रेक्षक तिकडे खेचला जातो. काही वेळेस नाटकाच्या जाहिरातीत जाणीवपूर्वक ‘चार देखण्या तरुणतरुणींसह’, ‘हॉट आयटम’, ‘चावट भय्या’ अशी वाक्ये टाकली जातात. प्रेक्षक त्यातही तरुण प्रेक्षक आकर्षित होईल अशी छायाचित्रे टाकून जाहिरातीची मांडणी केली जाते. थोडक्यात ‘बोल्ड’ जाहिरात करून प्रेक्षकांना नाटकाकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला जातो. अशा जाहिरातींमुळे किंवा त्यातील शब्द, वाक्य, छायाचित्रांमुळे प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियामधून त्यावर चर्चा, वाद झडतात. साहजिकच त्या नकारात्मक प्रसिद्धीचा फायदाही किमान काही प्रयोगांसाठी तरी त्या नाटकाला होतो. ज्येष्ठ बुकिंग क्लार्क हरी पाटणकर यांनी ‘रविवार वृत्तान्त’ ला सांगितले, ‘एक चावट संध्याकाळ’ आणि ‘एक चावट मधुचंद्र’ या दोन्ही नाटकांना बुकिंग चांगले आहे. दोन्ही नाटकांना पांढरपेशा, सुसंस्कृत प्रेक्षकांची उपस्थिती चांगली आहे. यात महिला प्रेक्षकांचीही संख्या मोठी असून मध्यमवयीन, तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थी अशा तीनही वयोगटांतील प्रेक्षक या नाटकांना येत आहेत.
खरे तर चावटपणा आणि अश्लीलता यातील सीमारेषा खूप पुसट आहे. चावटपणा नेमका कधी अश्लीलतेकडे झुकतो ते सांगता येत नाही. चावट विनोदात अनेकदा स्त्री किंवा पुरुष यांच्या विशिष्ट अवयवांची वर्णने किंवा शब्द येतात. मराठीतील काही विशिष्ट क्रियापदांचाही त्यात वापर केलेला असतो. यातून ज्या काही घाणेरडय़ा आणि चारचौघात सांगता येणार नाही अशा ‘कॉमेंट्स’ व्यक्त केल्या जातात. दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या नावावरून किंवा संवादावरूनही त्यांचे व परिनिरीक्षण मंडळातील सदस्यांचे वाद व्हायचे. दादांच्या चित्रपटांचे संवाद ‘द्वयर्थी’ असल्याबद्दलही त्यांच्यावर टीका केली जायची. पण असे असले तरी त्यात एक सुसंगती आणि डोक्याचा वापर केलेला असायचा.
रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या चावट, अश्लील नाटकांना ‘केवळ प्रौढांसाठी’ असे म्हटले जाते. परीनिरिक्षण मंडळाकडूनही तसे प्रमाणपत्र दिले जाते. सध्या थेट नावावरूनच चावट विषयांचा उल्लेख असलेली नाटके जशी रंगभूमीवर आहेत तशीच ‘देखणी बायको दुसऱ्याची’, ‘बायकोपेक्षा मेहुणी बरी’ सारखी नाटकेही मधूनमधून रंगभूमीवर येत जात राहतात. अशा प्रकारच्या सगळ्याच चावट आणि बोल्ड नाटकांना सध्या प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या वर्षभरात दोन नाटके रंगभूमीवर आहे आणि नव्या वर्षांतही ‘दोन बायका चावट ऐका’ सारखे नाटक रंगभूमीवर येते आहे. त्यामुळे सरत्या वर्षांत आलेली चावट आणि बोल्ट नाटकांची लाट नव्या वर्षांतही कायम राहणार असण्याची शक्यता नाटय़ व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

chatura article on small kid, chatura parent article
समुपदेशन : मुलांच्या जगातून पालक हरवतात?
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!