‘बॉलिवूडची बेबी डॉल अशी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री सनी लिओनीची ‘बी टाऊन’मधील सर्वात मादक अभिनेत्रींपैकी एक अशी ओळख आहे. तिचा भूतकाळ जरी वेगळा असला तरी वर्तमानात मात्र ती आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत नक्कीच बसते. आज कित्येक बॉलिवूड निर्मात्यांना तिचे एखादे तरी आयटम साँग आपल्या चित्रपटात हवे असे वाटत असते. आगामी रईस चित्रपटात आयटम साँगमध्ये झळकणा-या अभिनेत्री सनी लिओनीच्या मते पॉर्न बघण्यात भारतीय वरच्या स्थानावर आहेत.

सनी लिओनीने टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, अॅडल्ट मटेरियल ही खूप वैयक्तिक बाब आहे. पण जे सत्य आहे त्यास तुम्ही नाकारू शकत नाही. या मुलाखतीत तिने तिचा आजवरचा प्रवास आणि पती डॅनियल वेबर याविषयीच्या अनेक गोष्टी सांगितल्या. पॉर्न पाहण्यात भारतीय चौथ्या स्थानावर आहेत असे सनीला विचारले असता त्यावर ती म्हणाली की, हे सत्य आहे आणि त्यापासून तुम्ही पळ काढू शकत नाही.

नुकतीच सनीला ‘रईस’ चित्रपटात बॉलिवूडच्या किंगसोबत म्हणजे शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. आता एवढे सगळे कौतुक करत असताना आणि नाव कमावत असतानाही सनीला मात्र आजही एक खंत सतावत आहे. ‘काही वर्षांपूर्वी जेव्हा मी या सिनेसृष्टीत आले तेव्हा मला लगेचच कुणी भूमिका दिल्या नाहीत. उलट, ‘तुझे इथे काही होऊ शकणार नाही. तुला लहान मोठ्या भूमिका करुनच परतावे लागेल, अशी वाक्ये मला सतत ऐकायला मिळाली,’ असे ती म्हणाली. पण, मला असे वाटते की, रईस चित्रपटातील माझ्या गाण्यामुळे सर्वांनाच आता माझे महत्त्व कळले असेल. तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगताना ती म्हणते,‘माझा प्रवास सोपा कधीच नव्हता. चित्रपटात काम मिळवण्यासाठी मला खूप लोकांची बोलणी ऐकून घ्यावी लागली होती. खूप स्ट्रगलनंतर मला चित्रपट मिळू लागले. मला सोशल मीडियानेच मोठे केले. त्यामुळे मी स्वत:ला सोशल मीडियाचे एक प्रोडक्टच मानते.’

सनी लिओनीने ‘जिस्म २’,‘कुछ कुछ लोचा हैं’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आव्हान स्वीकारणाऱ्या सनीने प्रत्येक भूमिकेसाठी अथक मेहनत घेतली. त्याचे फलित म्हणूनच आज तिला बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री अशी स्वतंत्र ओळख मिळाली आहे.