पाकिस्तानी कलाकारांना भारतात केल्या जाणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्येही आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘शिवाय’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत. हे चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले असतानाच पाकिस्तानमध्ये या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. सीमेपलीकडील चित्रपट वितरकांनी दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण पाहता हे चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. ‘शिवाय’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ हे दोन्ही चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाहीत, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. काही काळापूर्वी या दोन्ही चित्रपटांवरील बंदी उठवण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण सध्यातरी तसे काहीच होताना दिसत नाहीए.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तामनध्ये भारतीय टेलिव्हीजन वाहिन्यांवर आणि रेडिओ सेवांवर बंदी घलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाकिस्तानमध्ये भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्याचा इशारा देऊनही जे वितरक भारतीय वाहिन्यांचे प्रसारण सुरुच ठेवतील त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही ‘पर्मा’तर्फे स्पष्ट करण्यात आले होते. पाकिस्तानमधील ‘केबल ऑपरेटर्स’ना भारतीय वाहिन्या प्रसारित न करण्याची ताकीद देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान ही तणावग्रस्त परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत पाकिस्तानमधील काही चित्रटगृहांच्या मालकांनीदेखील भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.