‘पद्मावत’ चित्रपट न पाहताच त्यावरून वादळ निर्माण करणे चुकीचे आहे, असे सांगत ऐतिहासिक विषयांवर खुलेपणाने बोलण्यासारखी परिस्थिती आपल्याकडे राहिली नाही, अशी खंत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी चिंचवड येथे व्यक्त केली. आता ऐतिहासिक व्यक्तिरेखा असलेले चित्रपट करण्याची भीतीच वाटते, असेही त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिशिर व्याख्यानमालेत मृणाल कुलकर्णी यांची प्रा. शिल्पागौरी गणपुले यांनी मुलाखत घेतली. ‘स्वामी’तील रमापासून ‘येरे रे येरे पैसा’ पर्यंतचा सिनेक्षेत्रातील २५ वर्षांतील प्रवास या मुलाखतीतून उलगडला. सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेल्या ‘पद्मावत’संदर्भात मृणाल म्हणाल्या की, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची, वीरपुरुषांची ओळख करून देण्यासाठी चित्रपट सशक्त माध्यम असून त्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला पाहिजे. ऐतिहासिक चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाकडे वळता येते. चित्रपटात सविस्तरपणे मांडणी करता येते. किरकोळ चुका असतील तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. चित्रपट न पाहताच मत तयार करण्यापेक्षा आधी चित्रपट प्रदर्शित होऊ दिला पाहिजे. ‘बाजीराव मस्तानी’च्या प्रदर्शनापूर्वी अनेक आक्षेप होते. नंतर ते राहिले नाहीत. नकारात्मक वातावरण असल्यास ऐतिहासिक वीरपुरुषांवर चित्रपट काढण्याचे धाडसकोणी करणार नाही. आतापर्यंत अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा सादर केल्या. आता ऐतिहासिक चित्रपट करण्याची भीतीच वाटते. अनेक कलाकार तशी भीती व्यक्त करू लागले आहेत.

इतिहास व साहित्य ही आवडीची क्षेत्र आहेत. अभिनयात करीअर करायचे ठरवले नव्हते, असे सांगत कुटुंबीयांनी दिलेली भक्कम साथ व प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच इथपर्यंत पोहोचू शकल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. या क्षेत्रात फार असा संघर्ष करावा लागला नाही. मात्र नकारात्मक आणि विनोदी ढंगाच्या भूमिका वाटय़ाला आल्या नाहीत. ‘येरे रे येरे पैसा’मध्ये प्रथमच तशी संधी मिळाली. यापुढे वेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा आहे. यश-अपयश प्रेक्षकांच्या व नशिबाच्या हाती असते. मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपट प्राधान्याने पाहिले पाहिजे. मराठी चित्रपटसृष्टीच्या बळकटीसाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. मराठी चित्रपट पाहणाऱ्या अमराठी प्रेक्षकांची संख्या अलीकडे खूपच वाढली आहे. महिलांनी स्वत:च्या आरोग्याविषयी जागरूक असले पाहिजे, असे विविध मुद्दे त्यांनी मांडले. ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेतील जिजाऊची मृणालने साकारलेली भूमिका सर्वाधिक आवडल्याचे त्यांचे पती रुचिर कुलकर्णी यांनी सांगितले. जिजाऊ या आदर्श माता होत्या. त्यांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले व मुलाकडून ते सत्यात उतरवले, असे मृणाल यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afraid to do historic character movie says actress mrinal kulkarni
First published on: 22-01-2018 at 02:22 IST