देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सतत करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी याला देखील करोनाची लागण झाली आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

‘मित्रांनो, मी आशा करतो की तुम्ही सगळे फिट आणि फाईन आहात. तसेच स्वत:ची योग्य ती काळजी घेत आहात. मला खोकला आणि ताप येत आहे. त्यामुळे मी करोनाची चाचणी करुन घेतली. दुर्दैवाने माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. आता मला डॉक्टरांनी घरीच क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला आहे’ असे आफताबने पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्याने पुढे पोस्टमध्ये म्हटले, ‘जे लोकं माझ्या संपर्कात आले त्यांना सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्या आणि सुरक्षित रहा. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मी लवकरच ठिक होईन.’ तसेच प्रत्येकाने सॅनेटायजर आणि मास्कचा वापर करा असे आफताब पुढे म्हणाला आहे.

गेल्या चोवीस तासांत देशात ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद झाली असून १ हजार २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४६ लाख ५९ हजार ९८५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ९ लाख ५८ हजार ३१६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत ३६ लाख २४ हजार १९७ रूग्णांनी उपचारानंतर करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ७७ हजार ४७२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.