जीएसटी करप्रणालीचा मुद्दा आता वेगळ वळण घेताना दिसत आहे. चित्रपटगृहातील तिकीट दरांवर जीएसटी कर लागू करण्याच्या मुद्द्यावर अभिनेता कमल हसन यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. जीएसटी करप्रणाली चित्रपट व्यवसायासाठी फायद्याची नाही, असं म्हणत त्यांनी चित्रपटसृष्टी सोडण्याचा इशारा दिला.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना विनंती करत चित्रपट तिकीटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. १२ ते १५ टक्के जीएसटी कमी करण्याची मागणी करत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भारतातील प्रत्येक राज्यात मनोरंजन आणि इतर वस्तूंवरील करांमध्ये विविधता आढळते. चित्रपटगृहांतील करमणूक कर दर २८ टक्के झाल्याने लोकांना आता तिकिटावर अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. यालाच अनुसरुन हसन यांच्या म्हणण्यानुसार बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपट याच करप्रणाली अंतर्गत ठेवता येऊ शकत नाहीत. ही करप्रणाली प्रादेशिक चित्रपटांसाठी हानिकारक आहे असं मतही त्यांनी मांडलं.

कमल हसन यांच्या मागोमाग आता निर्माते बोनी कपूर यांनीही जीएसटीच्या मुद्द्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक निर्माता म्हणून बोनी कपूर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘नक्कीच या करप्रणालीचा प्रादेशिक चित्रपट निर्मात्यांवर परिणाम होणार आहे. बऱ्याच राज्यातील चित्रपट निर्माते अर्थमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करत आहेत. माझ्या मते या गोष्टीच्या सकारात्मक बाजूकडेही सर्वांनी पाहिलं पाहिजे. किंबहुना ही वादग्रस्त करप्रणाली आपल्यासाठी फायद्याचीही ठरु शकते’, असं बोनी कपूर म्हणाले.

वाचा: भारतीय संघाच्या ‘जबरा फॅन’साठी ‘तो’ जमवतोय देणगी

गेल्या काही दिवसांपासून जीएसटीचा मुद्दा बराच चर्चेत आला आहे. चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज मंडळींनी आता या मुद्द्यावर त्यांची मतं मांडण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हा आता चित्रपट तिकीट दराच्या बाबतीत अर्थमंत्र्यांकडून कोणता निर्णय घेण्यात येणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.