बुधवारी बॉलिवूड अभिनेता आमिर खानला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. आमिर खान क्वारंटाइन झाला असून, त्याच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता आमिर पाठोपाठ बॉलिवूड अभिनेता आर माधवनला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

आर माधवनने ट्विटर अकाऊंटवर ३ इडियट्स या चित्रपटातील एक पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने मजेशीर अंदाजात करोना झाल्याचे सांगितले आहे. ‘फरहानने नेहमीच रँचोला फॉलो केले आहे आणि व्हायरस नेहमी आमच्या मागेच असतो. पण त्याने आम्हा दोघांनाही पकडले आहे. पण ऑल इज वेल आणि आम्ही लकरच बरे होऊ. ही अशी जागा आहे जिकडे राजू पोहोचू नये असे आम्हाला वाटते’ या आशयाचे ट्वीट आर माधवनने केले आहे.

आमिर खानच्या प्रवक्त्याने त्याला करोना झाल्याची माहिती दिली होती. “आमिर खानला करोनाचा संसर्ग झाला आहे. तो आता होम क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच सर्व नियमांचं पालन करत आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी,” असे आमिरच्या प्रवक्त्याने म्हटले होते.

भारतात गेल्या २४ तासात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या पाच महिन्यात ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. यासोबतच भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे. याशिवाय २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.