पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी सध्या कोणत्या क्रिकेट सामन्यामुळे किंवा त्याच्या कोणत्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला नसून, भारतातील परिस्थितीविषयी केलेल्या एका ट्विटमुळे त्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये झालेल्या १३ दहशतवाद्यांच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त करणाऱ्या आशयाचं ट्विट त्याने केलं होतं. या एका ट्विटनंतर भारतातून अनेकांनीच त्याच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली. माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्यापासून विराट कोहली, गौतम गंभीर यांनीही आफ्रिदीवर निशाणा साधला. त्यामागोमाग आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनीही त्याला ट्विटच्या माध्यमातून खडे बोल सुनावले आहेत.

‘प्रिय आफ्रिदी, मानवाधिकारांचं उल्लंघन न होता काश्मीरमध्ये शांततापूर्ण वातावरण दिसावं अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही या मुद्द्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे की पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया होणार नाहीत, पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवाद्याना प्रशिक्षण देणारी शिबीरं बंद केली जातील, त्यांना पाकिस्तानी सैन्याकडून पाठिंबा दिला जाणार नाही. या सर्व समस्या सोडवण्यासाठी हाच सर्वोत्तम उपाय ठरु शकतो’, असं ट्विट करत अख्तर यांनी आफ्रिदीच्या ट्विटला उत्तर दिलं आहे.

खासदारकीच्या शेवटच्या काळात सचिनचा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’, ही बातमी वाचून तुम्हालाही सचिनचा अभिमानच वाटेल

भारतीयांकडून मिळणारी ही उत्तरं पाहता आफ्रिदीनेही पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. ‘टाइम्स नाऊ’शी संवाद साधताना त्याने केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा अनेकांनीच त्याच्यावर निशाणा साधला. ‘तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान तिथे समोसा आणि भजीचा स्टॉल लावून बसला आहे? तुम्हीच विनाकारण अडचणी उभ्या करत आहात. तुम्हीच माणुसकीच्या सीमा ओलांडत आहात’, असं तो म्हणाला. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता भारतव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करणं आफ्रिदीला चांगलच भोवलं असं म्हणायला हरकत नाही.