बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे संजना सांघी. दिल बेचारा या चित्रपटातून संजनाने कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे या चित्रपटात संजनाने केलेला अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला. त्यामुळेच संजना सांघी हे नाव कमी वेळात लोकप्रिय झालं. संजना लवकरच ‘ओम : द बॅटल विदइन’ या चित्रपटात झळकणार आहे.

सुशांत सिंह राजपूतसोबत स्क्रीन शेअर केल्यानंतर संजना कलाविश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेतासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत संजनाने तिच्या आगामी चित्रपटाविषयी आणि सहकलाकाराविषयी भाष्य केलं.

 वाचा :  ‘इंदू की जवानी’चा ट्रेलर प्रदर्शित; पाहा कियारा- आदित्यची भन्नाट केमिस्ट्री

‘ओम : द बॅटल विदइन’ या चित्रपटात संजना अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. “मी अनेक स्क्रिप्ट वाचल्या पण ‘ओम : द बॅटल विदइन’ या चित्रपटाची पटकथा खूप वेगळी आहे. यात माझी भूमिका थोडीशी वेगळी आहे. मी एका सामान्य कुटुंबातील मुलीची भूमिका साकारत असून तिला आयुष्यात काही तरी करुन दाखवायचं आहे, असं संजना म्हणाली.

दरम्यान, कपिल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याची चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे हे चित्रीकरण भारतासह विदेशातदेखील होणार असल्याचं म्हटलं जात आहे.