आठ महिन्यांच्या खंडानंतर होत असलेल्या नाटय़प्रयोगाची तिकिटे कलाकारांच्या हस्ते स्वीकारत ‘मराठी माणूस नाटय़वेडा असतो’ याची प्रचिती रसिकांनी रविवारी दिली. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाच्या तिकिटांची खरेदी करण्यासाठी नाटय़गृहांवर रसिकांनी लावलेली रांग आणि अवघ्या तासाभरात नाटकाची तिकिटे संपल्याचा योग जुळून आल्याने कलाकारांचा उत्साह द्विगुणित झाला.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून बंद असलेली नाटय़गृहे ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली. मात्र, नाटकाचे सेट लावणारे पडद्यामागचे कलाकार टाळेबंदीमध्ये आपापल्या गावी निघून गेल्यामुळे नाटकाचे प्रयोग थांबले होते. आता प्रशांत दामले आणि कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा शनिवारी (१२ डिसेंबर) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे, तर रविवारी (१३ डिसेंबर) बालगंधर्व रंगमंदिर आणि प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे प्रयोग होणार आहेत. या नाटकाच्या तिकिटांची विक्री रविवारी करण्यात आली. त्यानिमित्ताने प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी या तीनही नाटय़गृहांना भेट देऊन पहिल्या पाच रसिकांना तिकिटे प्रदान केली. रसिकाच्या हस्ते नारळ फोडून तिकिट विक्रीचे उद्घाटन करण्यात आले.

केवळ एका तासात तिकिटांची विक्री झाल्यामुळे मराठी माणूस नाटय़वेडा असल्याची प्रचिती आल्याची भावना प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. रसिकांनी दाखविलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आनंद तर झालाच आहे, पण रसिकांचे चांगले मनोरंजन करण्याचे दडपणही आमच्यावर आहे, असे कविता लाड यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद कोथरूड शाखा, संवाद आणि पुणेकर रसिकांतर्फे दामले आणि लाड यांचा सत्कार करण्यात आला. सुनील महाजन, समीर हंपी,प्रवीण बर्वे, सत्यजित धांडेकर या वेळी उपस्थित होते.