बॉलिवूडप्रमाणेच आता मराठी चित्रपटसृष्टीतही चित्रपटांचे सिक्वेल येऊ लागले आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘बॉईज’ सारख्या चित्रपटांनंतर आता अजून एका चित्रपटाचा सिक्वेल येत आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१५ मध्ये आलेला ‘दगडी चाळ’ प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. मकरंद देशपांडे यांनी निभावलेली अरुण गवळीची भूमिका चित्रपटाची मुख्य केंद्रबिंदू होता. विशेष म्हणजे ‘दगडी चाळ २’च्या निमित्ताने जवळपास ४ वर्षांनी डॅडी अर्थात चित्रपटामध्ये डॅडींची भूमिका साकारणाऱ्या मकरंद देशपांडे यांनी दगडी चाळीला भेट दिली.

अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क ४ वर्षांनी ‘डॅडी’ दिसले. नवरात्रीच्या दिवसांमध्ये मकरंद देशपांडे यांनी चित्रपटातील डॅडींच्या लूकमध्ये दगडी चाळीत हजेरी लावली. विशेष म्हणजे त्यांचा हा लूक पाहून तेथील रहिवाशांना काही काळासाठी खरंच डॅडी आल्याचा भास झाला.

रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व पाहून तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. काहींनी हारही घातले. त्या वेळी काही लोकांनी निरखून पाहिले असता ‘डॅडीं’च्या वेशात चक्क मकरंद देशपांडे होते. मकरंद यांच्याकडे पाहून खुद्द ‘डॅडी’ असल्याचाच भास सर्वांना झाला. मकरंद देशपांडे यांनी सुद्धा ‘डॅडीं’चे व्यक्तिमत्व, वेशभूषा तंतोतंत साकारली होती. दगडी चाळीत जाण्याचे खरं तर खास निमित्त होते. तिथे जाऊन मकरंद यांनी देवीची आरती करत, २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.

‘दगडी चाळ २ ‘ या चित्रपटाची निर्मिती संगीता अहिर आणि क्रिश अहिर यांनी केली असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. ‘दगडी चाळ २’ मध्ये पुन्हा अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची फुलत जाणारी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले आहे. तर या चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे.