संजल लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या मार्गात येणारे अडथळे काही केल्या कमी होत नाहीत. करणी सेनेमागोमाग आता ब्राम्हण महासभेनेही या चित्रपटाचा विरोध केला आहे. इतिहासात नमूद केलेल्या माहितीची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा ‘सर्व ब्राम्हण महासभे’चे प्रदेशाध्यक्ष सुरेश मिश्रा यांनी जारी केलेल्या एका पत्रकातून दिला आहे.

महाराणी पद्मावती भारताची शान होत्या. १६००० राजपूत महिलांसोबत त्यांनी केलेला जौहर एक उत्तम उदाहरण प्रस्थापित करुन गेला. अशा या कर्तृत्त्ववान आणि धाडसी महाराणीच्या त्यागावर आधारित चित्रपट साकारून आणि त्यात चुकीचे बदल करुन भन्साळी ज्या पद्धतीने हा चित्रपट सादर करत आहेत ते मुळीच खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यासोबतच सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया पाहता या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी अन्यथा सर्व ब्राम्हण महासभेचा या चित्रपटाला असलेला विरोध कायम राहिल, असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

भन्साळींचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी असले तरीही चित्रपटाला होणारा विरोध मात्र काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच करणी सेना, जय राजपूताना संघ या संघटनांनी ‘पद्मावती’ला विरोध केला होता. त्यातच आता सर्व ब्राम्हण महासंघांने चित्रपटाला विरोध केल्यामुळे या चित्रपटामागी साडेसाती काही केल्या संपण्याचे नाव घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तेव्हा आता ते ही सर्व परिस्थिती कशा प्रकारे हाताळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.