बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने २०१४ मध्ये पूर्वाश्रमीचा प्रियकर नेस वाडिया याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने नेसवर आयपीएल सामन्यादरम्यान आपली छेडछाड केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत होते. शेवटी मंगळवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

१३ जून २०१४ मध्ये मरिन ड्राइव्ह पोलिस स्थानकात प्रितीने नेसविरोधात तक्रार दाखल केली होती. नेसवर भारतीय दंडविधानाच्या कलम ३५४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या वेळी हा सर्व प्रकार घडला होता. तक्रार दाखल करतेवेळी नेससुद्धा त्या ठिकाणी हजर होता. त्याची २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटकाही करण्यात आली होती. ‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नेसविरोधात तब्बल ५०० हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती दिली.

वाचा : प्रियाच्या व्हायरल गाण्याचे गीतकार आज करत आहेत जनरल स्टोअरमध्ये काम

काय होतं प्रकरण?
किंग्स इलेव्हन पंजाब या आयपीएल संघात भागीदार असलेले उद्योगपती नेस वाडिया आणि अभिनेत्री प्रिती झिंटा यांच्यातील प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. ३० मे २०१४ रोजी वानखेडे स्टेडिअमवरील एका सामन्यादरम्यान नेस वाडियाने आपला विनयभंग करत अर्वाच्च भाषा वापरल्याचा आरोप प्रितीने केला होता.