अभिनेत्री कंगना रणौतच्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या मार्गात सतत काही ना काही अडथळे आले. सुरुवातीला चित्रपटाला काही संघटनांकडून विरोध झाला, त्यानंतर दिग्दर्शकाने मध्येच चित्रपट सोडला आणि पाठोपाठ अभिनेता सोनू सूदनेही चित्रपटातून काढता पाय घेतला. दिग्दर्शन आणि पटकथालेखनात कंगनाने गरजेपेक्षा जास्त ढवळाढवळ केल्यानेच दिग्दर्शकाने चित्रपट सोडल्याची चर्चा आहे. आता या सर्व गोष्टींचा धसका ‘पंगा’ चित्रपटाच्या दिग्दर्शिकेने घेतला आहे. अश्विनी अय्यर तिवारीच्या आगामी ‘पंगा’ चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत आहे.

काही महिन्यांपूर्वीच कंगनाने या चित्रपटाची ऑफर स्विकारली. पण कंगनाच्या चित्रपटात लुडबूड करण्याच्या स्वभावाचा अश्विनीने चांगलाच धसका घेतला आहे. कंगनाने असं काही करू नये म्हणूनच तिने एक विशेष करार साईन करून घेतल्याचं म्हटलं जात आहे. ‘no interference contract’ म्हणजेच या करारानुसार दिग्दर्शनाच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप कंगनाला करता येणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, कंगना व अश्विनीत अनेक बैठका झाल्या आहेत. कंगना या चित्रपटातील भूमिकेला पूरेपूर न्याय देईल, असा विश्वास अश्विनीला आहे. पण दिग्दर्शकाच्या कामात कंगनाची ढवळाढवळ तिला मान्य नाही.

वाचा : ‘ती गोष्ट माझ्या तोंडावर बोलण्याची हिंमत फक्त रणबीरमध्येच’

कंगनाने याआधी विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ आणि हंसल मेहता यांच्या ‘सिमरन’ चित्रपटाच्या दिग्दर्शनातही हस्तक्षेप केला होता. यामुळे तिने दिग्दर्शकांची नाराजी ओढवून घेतली. सध्या ‘मणिकर्णिका..’ या चित्रपटाचं दिग्दर्शन कंगनात करत आहे. चित्रपटातील काही कलाकारांनी माघार घेतल्याने बरेच दृश्य पुन्हा शूट केले जात आहेत. त्यामुळे ‘मणिकर्णिका..’चं प्रदर्शन लांबणीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.