देशभरात #MeToo मोहिमेचं वादळ घोंघावत आहे आणि त्याचे परिणामसुद्धा कलाविश्वात पाहायला मिळत आहेत. लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांनंतर यशराज फिल्म्सने आशिष पाटील यांची हकालपट्टी केली आहे. आशिष पाटील हे यशराज फिल्म्सचे उपाध्यक्ष, ब्रँड पार्टनरशिप व टॅलेंट मॅनेजमेंट, बिझनेस व क्रिएटीव्ह हेड पदावर कार्यरत होते. या पदावरून त्यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचं यशराज फिल्म्सने जाहीर केलं.

आशिष पाटील यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. ‘२०१६ मध्ये मी आशिष पाटील यांना ईमेल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला. यशराजच्या ऑफीसमध्ये भेटण्याचं आश्वासन त्यांनी मला दिलं आणि मी एकदा भेटायलासुद्धा गेले. या भेटीदरम्यान त्यांनी सुरुवातीला माझ्याशी सामान्य चर्चा केली. पण अचानक थोड्या वेळाने चल आपण ड्राइव्हला जाऊ असं म्हणाले. मी त्यांच्यासोबत गेले पण सार्वजनिक ठिकाणी असं फिरणं योग्य नाही म्हणत त्यांच्या घरी ते मला घेऊन गेले. तिथे त्यांनी माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला,’ असं त्या महिलेनं म्हटलं होतं.

वाचा : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का? यावर अनिता दाते म्हणते..

या महिलेचे सर्व आरोप आशिष पाटील यांनी फेटाळले होते. पण या संपूर्ण प्रकरणाची यशराज फिल्म्सने गंभीर दखल घेतली आणि आशिष पाटील यांना कामावरून काढून टाकले. ‘आम्ही यशराज फिल्म्समध्ये महिलांना सुरक्षित वातावरण देऊ इच्छितो. इथे येणाऱ्या प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटावं ही आमची जबाबदारी आहे,’ असं यशराज फिल्म्सने स्पष्ट केलं आहे.