16 December 2017

News Flash

पाकिस्तानमध्येही ‘बाहुबली २’ची चलती!

पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने कोणतीही कात्री न लावता चित्रपटाला हिरवा कंदील दिला.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 18, 2017 6:34 PM

‘बाहुबली २’ चित्रपट जगभरात सर्वत्र आपली छाप पाडत असल्याचे चित्र आहे. जगभरातील सर्वच लोक या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. नेपाळमधील बॉक्स ऑफिसवरही ‘बाहुबली २’ने दमदार कमाई केल्याचे वृत्त नुकतेच येऊन गेले होते. नेपाळमधील ‘छक्का पंजा’ या चित्रपटालाही त्याने कमाईत मागे टाकले आहे. त्यानंतर आता पाकिस्तानमध्येही एसएस राजामौलीच्या या चित्रपटाला समीक्षकांची पसंती मिळाली आहे. ‘डेक्कन क्रोनिकल’ वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ‘बाहुबली २’ ने पाकिस्तानमध्ये ४.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच, तेथे जवळपास १०० चित्रपटगृहांमध्ये प्रभासचा हा चित्रपट दाखवला जातोय.

पाकिस्तानमधील वितरक अमजद रशिद यांनी म्हटले की, यामध्ये जरी पौराणिक आणि हिंदू परंपरा काही प्रमाणात दाखवण्यात आल्या असल्या तरी खासकरुन सिंगल स्क्रिनवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. यातील वीएफएक्स आणि अॅक्शन सिन्सने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. इतकेच नव्हे तर, पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने कोणतीही कात्री न लावता चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी हिरवा कंदील दिला. चित्रपटात कोणतेही आक्षेपार्ह दृश्य नव्हते त्यामुळे त्यातील एकही दृश्य काढण्यात आलेले नाही, असेही रशिद म्हणाले.

‘बाहुबली द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली द कन्क्लुजन’ मधील अमरेंद्र बाहुबली व महेंद्र बाहुबलीच्या भूमिकेमुळे अभिनेता प्रभास मोठा स्टार बनला आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्याचे चाहते निर्माण झाले आहेत.  सध्या मुलींच्या हृदयावर कोणी राज्य करत असेल तर तो प्रभास आहे. प्रभासला चक्क सहा हजार मुलींचे लग्नासाठी प्रस्तावही आले होते. मात्र, त्याने ते नम्रपणे नाकारले. त्याच्या आयुष्यात एक मुलगी असून, तो लवकरच तिच्याशी लग्न करणार असल्याचे म्हटले जातेय. प्रभासव्यतिरीक्त चित्रपटात राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, सत्यराज, नसिर, रम्या कृष्णन यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

First Published on May 18, 2017 6:34 pm

Web Title: after nepal baahubali 2 now declared a hit in pakistan