अमेरिकन पॉपस्टार सिंगर रिहानाने दिल्लीत सुरू असलेल्या कृषी कायद्या विरोधातील आंदोलनाचे समर्थन केल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. फक्त रिहानाने नाही तर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने आणि पॉर्नस्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगन, सुनील शेट्टी आणि निर्मात-दिग्दर्शक करण जोहरने देखील या संदर्भात ट्वीट केले आहे. विदेश मंत्रालयाच्या ट्वीटला रिट्वीट करत अक्षय म्हणाला, “शेतकरी हा देशाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जात आहे. मतभेद निर्माण करणाऱ्या प्रत्येकाकडे लक्ष देण्यापेक्षा #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda” अशा आशयाचे ट्वीट अक्षयने केले आहे.

अक्षयच्या पाठोपाठ अभिनेता अजय देवगनने ही ट्वीट केले आहे. “भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध सुरु असलेल्या कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. अशा परिस्थितीत भांडण करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे.”

सुनिल शेट्टीने देखील ट्वीट केले आहे. “अर्धवट सत्य जाणून घेणे या पेक्षा कोणतीही गोष्ट वाईट नसते. म्हणून, आपण कोणत्याही गोष्टीचा विचार सर्व बाजूने केला पाहिजे” या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे.

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने देखील ट्वीट केले आहे. त्याचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.