बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्राने काही दिवसापूर्वीचं अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. १ आणि २ डिसेंबर रोजी जोधपूरमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने या जोडीने लग्न केलं. या लग्नाच्या चर्चा थांबत नाहीत तर चोप्रा कुटुंबियांविषयीची नवी चर्चा सुरु झाली आहे. प्रियांकानंतर तिची बहीण अभिनेत्री परिणीती चोप्राही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे देसी गर्लच्या लग्नानंतर चोप्रा यांच्या घरात पुन्हा एकदा सनईचे सूर निनादणार असल्याचं दिसून येत आहे.

परिणीती तरित देसाईसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून चरित आणि परिणीती गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. विशेष म्हणजे चरितचा चोप्रा कुटुंबियांसोबत असलेला घरोबादेखील वाढल्याचं पाहायला मिळत आहे. प्रियांका-निकच्या लग्नात चरितची आवर्जुन उपस्थिती असल्याचं पाहायला मिळालं होतं. प्रियांकाच्या मेहंदी सोहळ्यापासून ते प्रि-वेडिंग फंक्शनपर्यंत प्रत्येक सोहळ्यामध्ये तो दिसून आला होता. या सोहळ्यातील एक फोटोही परिणीतीने शेअर केला होता. यावेळी  ‘फ्रेंड्‌स…फॅमिली…’ असं कॅप्शन तिने दिलं होतं.


दरम्यान, प्रियांकानंतर आता परिणीतीही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं दिसून येत आहे. चरित देसाई हा असिस्टंट डायरेक्‍टर आहे. त्याने आतापर्यंत ‘अग्निपथ’ आणि ‘रन’मध्ये असिस्ट केल्याचं पाहायला मिळालं आहे.