‘द कपिल शर्मा शो’ मध्ये ‘विद्यावती’ हे विनोदी पात्र साकारणारी सुगंधा मिश्रा लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. कपिल शर्मा शोच्या काही भागांमध्ये झळकलेल्या डॉ. संकेत भोसलेसोबत सुगंधा लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय. संजय दत्त आणि सुनील शेट्टीची नक्कल करणारा संकेत आणि सुगंधा गेल्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे आता या दोघांनीही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेलत्याचं म्हटलं जात होतं.

सुगंधाने या सर्व चर्चा खोट्या असल्याचं सांगत, संकेत आपला चांगला मित्र असल्याचं स्पष्ट केलं आहे. याविषयी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत सुगंधा म्हणाली, ‘हे सर्व खोटं आहे. आम्ही कार्यक्रमामध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडची व्यक्तिरेखा साकारतो. पण, खऱ्या आयुष्यात तसं काहीच नाहीये. आम्ही खूप चांगले मित्र आहोत, याआधीही आम्ही बऱ्याच प्रोजेक्ट्ससाठी एकत्र काम केलं आहे.’

संकेत आणि सुगंधाची केमिस्ट्री आणि या दोघांमध्ये असणारं बॉण्डिंग पाहता टेलिव्हिजन विश्वातही त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच चर्चा रंगत आहेत. त्यामुळे आता या विनोदी जोडीमध्ये असलेल्या नात्याचं नेमकं गुपित काय आहे हे जाणून घेण्यासाठी अनेकजण सुगंधा-संकेतच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा आधार घेत आहेत.

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये बराच काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर सुनील ग्रोवर, अली असगरमागोमाग सुगंधानेही या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. येत्या काळात सुगंधा आणि संकेत झी टीव्हीच्या ‘समर एक्स्प्रेस २०१७’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. याशिवाय येत्या काळात इतरही काही प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने संकेत-सुगंधा एकत्र काम करणार आहेत.

टेलिव्हिजन विश्वात रोज नवी नाती आणि त्याविषयीच्या चर्चांना उधाण येत असतं. अशाच चर्चांपैकी एक म्हणजे सुगंधा-संकेतच्या लग्नाची अफवा. याविषयी संकेतच्या एका निकटवर्तीयाने, ‘ही बातमी कळताच आम्ही खूप हसलो. कोणीतरी हे दोघंही लग्न करणार असल्याची हवा केली आणि इतरांनीही या चर्चेत उडी घेतली’, असं म्हणत त्याने हे सर्व खोटं असल्याचं स्पष्ट केलं.

‘द कपिल शर्मा शो’मधील एक लोकप्रिय पात्र म्हणून सुगंधाच्या व्यक्तिरेखेकडे पाहिलं जायचं. अभिनय आणि गायन क्षेत्रामध्ये योग्य तो समतोल राखत सुगंधाने टेलिव्हिजन विश्वामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संकेतविषयी सांगायचं झालं तर तो एक डॉक्टरही आहे. पण, सध्या मात्र तो टेलिव्हिजन विश्वामध्ये स्वत:चे स्थान बनवू पाहात आहे. त्यासोबतच ‘वूट’ अॅपवर त्याचा ‘बाबा की चौकी’ हा कार्यक्रमही सुरु आहे. या कार्यक्रमामध्ये संकेत ‘संजूबाबा स्टाईल’मध्ये कलाकारांसोबत संवाद साधतो. संकेत आणि सुगंधामध्ये असणाऱ्या नात्यामागचं खरं गुपित तर ते दोघंच जाणतात. पण, त्यांची ऑनस्क्रिन ट्युनिंग आणि विनोदी शैली अनेकांचीच मनं जिंकत आहे हे नाकारता येणार नाही.