राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुहासिनी मणीरत्नम या राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये रंगली आहे. यामुळे नेटिझन्सना आश्चर्याचा धक्का बसला असून त्यांनी सुहासिनी यांना ट्रोल करायला सुरुवात केलीय. त्यांच्याशी निगडीत असलेल्या बहुतेक मिम्समध्ये त्यांच्या आणि कमल हसन यांच्यातील नातेसंबंधाचा उल्लेख आहे.

वाचा : शाहरुखला पुन्हा एकदा पालिकेचा दणका; ‘रेड चिलिज’च्या कार्यालयावर हातोडा

एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुहासिनी म्हणाल्या की, गेल्या बऱ्याच काळापासून आपल्याकडे एक महिला ( जे जयललिता ) शासन करत आहे. मग आम्ही राजकारणात प्रवेश का करू नये? केवळ कमल हसन आणि रजनीकांत हेच राजकारणात प्रवेश करणार का? जर लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला तर आम्हीही राजकारणात प्रवेश करू. ज्याप्रमाणे लोकांनी जयललितांवर विश्वास ठेवून त्यांना सरकार चालवण्याची जबाबदारी सोपवली, त्याप्रमाणे त्यांनी राधिका, रेवती, नाधिया आणि सुहासिनी यांच्यावरही विश्वास ठेवायला हवा. अखेर सर्वकाही नागरिकांवर अवलंबून आहे.

सुहासिनी यांच्या या वक्तव्यावरूनच त्यांना ट्रोल केले जाऊ लागले. यावर आपले मत ट्विटरवर मांडत त्या म्हणाल्या की, आपण ट्विटरचा वापर सामाजिक जागरूकता पसरवण्यासाठी, मैत्री वाढवण्यासाठी, आपल्याकडे असलेल्या माहितीचा प्रसार करण्यासाठी, नवीन प्रोजेक्ट्सची माहिती देण्यासाठी किंवा कोणतं नवीन पुस्तक वाचलं, चित्रपट पाहिला याविषयी सांगण्यासाठी करतो. जेव्हा इतक्या गोष्टी तुम्हाला ट्विटरच्या माध्यमातून करता येऊ शकतात मग तुम्ही द्वेषाचा प्रसार का करता? मी आज ज्या ठिकाणी आहे आणि जे काही काम करतेय त्याचा मला आनंद आहे. त्यामुळे खोटे वृत्त आणि तर्कवितर्कांवर तुमचा वेळ वाया घालवू नका.

वाचा : रुपेरी पडद्यावर पुन्हा झिंगाट एण्ट्री करण्यासाठी रिंकू सज्ज!

काही दिवसांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि कल्की कोचलीन यांच्यासोबत सुहासिनी ‘वेटिंग’ या बॉलिवूड चित्रपटात झळकल्या होत्या. तसेच, अभिनेता डल्कर सलमानच्या आजच प्रदर्शित झालेल्या ‘सोलो’ या दुहेरी भाषिक चित्रपटातही त्यांनी काम केलेय.