सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान, अजय देवगण या मंडळींनी चित्रपटनिर्मितीची समीकरणेच आजघडीला बदलून टाकली आहेत. एकेकाळी मोठे मानधन घेऊन चित्रपट करणारी ही मंडळी आता स्वत:च निर्माता म्हणून मैदानात उतरली आहेत. त्यांची लोकप्रियता मोठी त्यामुळे त्यांच्या जोरावर चित्रपट वितरण-विपणन खांद्यावर घेणाऱ्यांचं गणितही बळकट होत चाललं आहे. शंभर, दोनशे, पाचशे कोटींपेक्षाही जास्त व्यवसाय करणाऱ्या या कलाकारांचे चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटतात तेव्हा ही तोटय़ाची जबाबदारी कोणी घ्यायची, हा प्रश्न उरतोच. मात्र या मंडळींनी निर्माता म्हणून ती जबाबदारी स्वीकारत वितरकांना तोटा होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत चित्रपट व्यवसायात एक नवीन पायंडा घालून दिला आहे.

‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या जोरदार यशानंतर शाहरूख खानने पुन्हा एकदा दिग्दर्शक रोहित शेट्टीवर भिस्त ठेवून ‘दिलवाले’सारखा भव्य-दिव्य चित्रपट केला. आणि तो तितक्याच भव्य-दिव्यतेने आपटला. शाहरूखचा चित्रपट म्हणून देशभरातील चित्रपटगृहांमध्ये चार-चार शोज लावणाऱ्या वितरकांचे धाबे दणाणले. त्या वेळी शाहरूखने वितरकांचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी काहीएक रक्कम देण्याचे ठरवले होते. सलमानने मात्र आपल्या स्वभावाप्रमाणेच खुल्या दिलाने ‘टय़ुबलाईट’चा तोटा वितरकांना सहन करावा लागू नये म्हणून ५५ कोटी रुपये परत करण्याचा निर्णय घेतला. मुळात या चित्रपटाने आतापर्यंत एकंदरीत १२१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यातही सलमानच्या पथ्यावर पडलेला निर्णय म्हणजे त्याने याआधीच आपल्या चित्रपटांसाठी ‘स्टार’ वाहिनीबरोबर करार केला आहे. त्यामुळे चित्रपट चालला किंवा आपटला टेलीव्हिजनवर वितरणाच्या हक्कापोटीची एक मोठी रक्कम त्याच्या खात्यात दर चित्रपटागणिक जमा होते. अजूनही चित्रपट चित्रपटगृहांमधून दाखवला जातो आहे. त्यापैकी ५५ कोटी रुपये तो वितरकांना परत देणार असल्याने वितरक या निर्णयावर खूश आहेत. ‘जग्गा जासूस’च्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्माता म्हणून उडी घेतलेल्या रणबीर कपूरनेही आपल्या चित्रपटाचे अपयश आपल्या डोक्यावर घेण्याची तयारी दाखवली आहे. ‘जग्गा जासूस’ने पहिल्या आठवडय़ात एवढी गर्दी खेचली नसली तरी त्याची हळूहळू प्रसिद्धी वाढते आहे. चित्रपट अजूनही टिकून आहे. आणि तरीही आपला चित्रपट चांगली कमाई करण्यात अपयशी ठरला तर आपण वितरकांना पैसे परत देऊ, असे रणबीर कपूरने जाहीर केले आहे. एकापाठोपाठ एक आलेल्या या निर्णयांमुळे बॉलीवूडमध्ये हा नवीन पायंडाच पडतोय हे लक्षात घेण्यासारखे आहे. अर्थातच, हा पायंडा फक्त हिरो म्हणून न येता ‘निर्मात्यां’च्याही भूमिकेत शिरलेल्या बॉलीवूडच्या बडय़ा बडय़ा कलाकारांमुळे पडला आहे.

बडय़ा कलाकारांच्या नावाने बिग बजेट चित्रपट करणे आणि चालवणे हा बॉलीवूडचा जुनाच खेळ आहे. त्यांच्या नावावर चित्रपट धो धो चालतात आणि निर्माता-वितरकांच्याही हातात पैसा खेळतो. मात्र चित्रपट अपयशी ठरला तर होणारा तोटाही तितकाच मोठा असतो. या पाश्र्वभूमीवर आता जो पायंडा शाहरूख, सलमान आणि रणबीर यांनी पाडला आहे तो चांगला की वाईट, यावरही इंडस्ट्रीत चर्वितचर्वण सुरू आहे. कारण, याच कलाकारांच्या नावावर जेव्हा चित्रपट चालतो आणि निर्माते-वितरक नफा कमावतात तेव्हा त्यातला जास्तीचा पैसा ते कलाकारांना देतात का, असाही उलटप्रश्न काही निर्मात्यांनी उपस्थित केला आहे. मात्र निर्माता किंवा वितरक यांची याबद्दलची मतं काहीही असली तरी आपण कलाकार म्हणून नव्हे तर निर्माता म्हणून ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं या कलाकारांनी स्पष्ट केलं आहे. रणबीरने तर जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपल्या आजोबांनी राज कपूर यांनी जे नियम पाळले होतेच त्याचंच आपण पालन करत असल्याचं सांगितलं आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट सपशेल आपटला आणि वितरकांना खूप नुकसान सहन करावे लागले. राज कपूर यांच्यावर चहूबाजूंनी टीकाही झाली होती. मात्र ज्या वेळी ‘बॉबी’ चित्रपट चांगला चालला तेव्हा वितरकांना जास्तीचे पैसे देत राज कपूर यांनी त्यांचे नुकसान भरून काढले होते. हिंदी चित्रपटसृष्टीत हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. चित्रपट पूर्ण आपटला आणि कलाकार म्हणून जर त्यातून फायदा होत असेल तर त्यातली काही रक्कम मी वितरकांना द्यायला हवी, हे न्याय्य वाटत असल्याने ती भूमिका घेतल्याचे रणबीर कपूरने स्पष्ट केले आहे. तर सलमाननेही आपल्या चित्रपटामुळे वितरक, प्रदर्शक कोणाचेच नुकसान होऊ नये असे वाटत असल्याने पैसे परत करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. याआधी रजनीकांत यांनीही आपल्या चित्रपटासाठी अशा प्रकारे नुकसानभरपाई दिलेली आहे. सध्या तरी या कलाकारांनी काही एक बांधिलकी स्वीकारून घेतलेल्या या निर्णयाचे स्वागतच केले आहे. त्याचे परिणाम काय होतील किंवा भविष्यात त्याचे पडसाद कसे उमटतील, याबद्दल अजून तरी संदिग्धताच आहे.